मॉडेल व अभिनेत्री राखी सावंत तिच्या वैवाहिक आयुष्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. राखी सावंतने पती आदिल खानचं अफेअर असल्याचं उघड केलं होतं. आदिलविरोधात तक्रार दाखल केल्यानंतर ओशिवारा पोलिसांनी त्याला ७ फेब्रुवारीला अटक केली होती. अटक झाल्यानंतर आदिलला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
आदिलच्या पोलीस कोठडीची मागणी राखी सावंत व तिच्या वकिलांकडून करण्यात येत होती. त्यानंतर १६ फेब्रुवारीला आदिलला न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार २० फेब्रुवारीपर्यंत आदिलची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली होती. चार दिवसांच्या पोलीस कोठडीनंतर आदिलला आज पुन्हा अंधेरी कोर्टात हजर करण्यात आलं. आदिलचा अंधेरी कोर्टाबाहेरील व्हिडीओ समोर आला आहे.
हेही वाचा>> राखी सावंत प्रकरणावर रामदास आठवलेंची प्रतिक्रिया, म्हणाले “आदिल खानला…”
हेही वाचा>> निमृत कौरबरोबरच्या रिलेशनशिपच्या चर्चांवर शिव ठाकरेने सोडलं मौन, म्हणाला “माझ्या हृदयात…”
‘इन्स्टंट बॉलिवूड’ या इन्स्टाग्राम पेजवरुन आदिलला न्यायालयात नेत असतानाचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आदिलचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. आदिलला पोलीस कोठडी सुनावल्यानंतर राखीने आनंद व्यक्त केला होता. “आदिलची पोलीस कोठडी मिळणं गरजेचं होतं. त्याशिवाय माझं किती नुकसान झालंय हे समजलं नसतं. आदिलवर ज्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ते सिद्ध करण्यासाठी पोलीस कोठडी आवश्यक होती”, असं राखी म्हणाली होती.
राखी व आदिलने मे २०२२ मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. ‘बिग बॉस मराठी’च्या घरातून बाहेर पडल्यानंतर याचा खुलासा अभिनेत्रीने केला होता.अनेक दिवसांच्या ड्राम्यानंतर आदिलने राखीबरोबर लग्न केल्याचं मान्य केलं होतं. राखीने आदिलवर फसवणूक व मारहाण केल्याचे गंभीर आरोप केले आहेत. आदिलच्या अफेअरबाबत खुलासा करत राखीने त्याच्या गर्लफ्रेंडचं नावही जाहीर केलं होतं.