Ram Gopal Varma Talk’s About A R Rahman’s Music In Rangeela : राम गोपाल वर्मा बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ‘रंगीला’ हा त्यांच्या गाजलेल्या चित्रपटांपैकी एक. त्यामध्ये आमिर खान, ऊर्मिला मातोंडकर व जॅकी श्रॉफ हे कलाकार झळकले होते. राम गोपाल वर्मा यांनी आधीच ठरवलेलं की, या चित्रपटाला ए. आर. रहमानच संगीत देणार.

‘रंगीला’ चित्रपटाच्या निर्मात्यांना तेव्हा ए. आर रहमान यांच्याबद्दल फार‌ माहिती नव्हती; पण त्यांनी राम गोपाल वर्मा यांच्यावर विश्वास ठेवत चित्रपटाची निर्मिती केली. राम गोपाल वर्मा यांना रहमान यांच्यावर पूर्ण विश्वास होता; परंतु एक क्षण असा होता, जिथे त्यांना ए. आर रेहमान वेडे आहेत का? आणि त्यांचं संगीत किती भयानक आहे, असं वाटलं होतं.

राम गोपाल वर्मा यांनी सांगितला ‘रंगीला’मधील ए. आर. रहमान यांच्या गाण्याचा ‘तो’ किस्सा

‘रंगीला’ला ३० वर्षं पूर्ण झाल्यानिमित्त ’02India’ला नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत चित्रपटातील मेकर्सने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. या चित्रपटातील ‘हाये रामा ये क्या हुआ’ या गाण्याबद्दल बोलताना राम गोपाल वर्मा यांनी सांगितलं, “मला खूप वेगळ्या पद्धतीनं हे गाणं तयार व्हावं, असं वाटत होतं. त्यामुळे मी ‘काँटे नहीं कटते’ या ‘मिस्टर इंडिया’ चित्रपटातील गाण्याचा संदर्भ दिला होता‌ आणि तो एक ट्यून घेऊन माझ्याकडे आला, तेव्हा मला वाटलं हा वेडा झाला आहे का? मला वाटलं कदाचित त्याच्याकडून नकळत ही चूक झाली असेल.”

राम गोपाल वर्मा पुढे म्हणाले, “मी त्याला सांगितलं की, मला यामध्ये वेगळेपण हवं आहे आणि तू मला हे काय पाठवलं आहेस? तेव्हा रहमाननं मला सांगितलं की, सर हे तसंच बनवलं आहे.” याच मुलाखतीत रहमान यांनी याबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “जर तुम्ही आपल्या संस्कृतीनुसार पाहिलंत, तर आपल्याकडे हिंदू मायथॉलॉजीनुसार प्रत्येक भावनेसाठी राग आहे. आपल्याकडे गाणी त्यावर आधारित असतात. त्यामुळे मी आपल्या संस्कृतीनुसार काहीतरी वेगळं बनवण्याचा प्रयत्न करीत होतो.”

ए.आर रहमान यांची प्रतिक्रिया

रहमान म्हणाले, “मला विश्वास होता की, सरांना ते आवडेल. जेव्हा आम्ही याची निर्मिती केली तेव्हा मी त्यांची प्रतिक्रिया पाहिली आणि हे गाणं ऐकत असताना ते या गाण्यानुसार कसे शॉट्स घ्यायचे याचं पूर्वनियोजन करीत होते.”

राम गोपाल वर्मा याबद्दल म्हणाले, “मला कधीच वाटलं नव्हतं की, एक ट्यून अशा प्रकारे बनवली जाऊ शकते.” पुढे दिग्दर्शक म्हणाले, ” ‘रंगीला’च्या स्पिरिटबाबत शंका होती. जेव्हा त्यानं मला ‘स्पिरिट ऑफ रंगीला’ पाठवली, तेव्हा मी माझ्या चुलतभावाबरोबर होतो. आम्ही दोघांनी एकत्र ती ऐकली आणि त्याचा पहिला प्रतिसाद होता, ‘हे खूप वाईट आहे.’ तेव्हा मी गोंधळलो. मला काही समजत नव्हतं की, हे खरंच चांगलं आहे की वाईट. माझ्या डोक्यात काही वेगळंच होतं आणि रहमानने जे दिलं, ते मला अपेक्षितच नव्हतं. जेव्हा माझ्या भावानं त्याला ‘भयानक’ म्हटलं, तेव्हा मला खूप वाईट वाटलं.”

राम गोपाल वर्मा याबद्दल पुढे म्हणाले, “भावाकडून मिळालेल्या वाईट प्रतिसादानंतर मी माझ्या ड्रायव्हरला विचारलं. तोही म्हणला की, खूप भयानक आहे, हे काय आहे मला नाही आवडलं. त्यानंतर मी शूटच्या लोकेशनवर हे गाणं ऐकवलं तेव्हा दुपारच्या जेवणाच्या वेळी सर्व कलाकार ते गाणं गात होते. त्यांना ते पाठ झालेलं. त्यामुळे मला असं वाटतं की, हेच रहमानच्या म्युझिकचं वेगळेपण आहे. सुरुवातीला कदाचित लोकांना ते समजणार नाही. वारंवार ते ऐकू शकत नसतील. कारण- त्यांच्या डोक्यात दुसरी गाणी असतील; पण हळूहळू रहमानच्या गाण्याची सवय होते.”

दरम्यान, राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘रंगीला’ हा चित्रपट ८ सप्टेंबर १९९५ रोजी प्रदर्शित झाला होता. त्यावेळी हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. प्रेक्षकांनीही त्या सिनेमाला भरभरून प्रतिसाद दिलेला.