Ram Gopal Verma Talks About Janhvi Kapoor : राम गोपाल वर्मा बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शक आहेत. ते अनेकदा बॉलीवूड, हिंदी चित्रपट तसेच कलाकारांबद्दलची त्यांची प्रतिक्रिया व्यक्त करत असतात. अशातच त्यांनी बॉलीवूड अभिनेत्री जान्हवी कपूरबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.

जान्हवी कपूरने २०१८ मध्ये आलेल्या ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने इतर काही चित्रपटांतही काम केलं. अलीकडेच ती ‘परमसुंदरी’मध्ये झळकलेली. पण बऱ्याचदा आई-वडील मोठे कलाकार असले की, त्यांच्या मुलांची त्यांच्या कामाशी तुलना केली जाते आणि त्यामुळे अनेकदा कलाकार ट्रोलही होतात. जान्हवी कपूरला अनेकदा काही जण ती तिच्या आईसारखी दिसते, तसा अभिनय करते वगैरे म्हणतात; तर काही ती तिच्या आईसारखी दिसत नसून तिला अजून तिथे पोहोचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल, असंही म्हणताना दिसतात.

राम गोपाल वर्मा यांनीदेखील जान्हवी कपूरबद्दल अशीच काहीशी प्रतिक्रिया दिली आहे. ‘फिल्मी ग्यान’च्या वृत्तानुसार राम गोपाल वर्मा यांनी दिवंगत श्रीदेवीच्या कामाचं कौतुक केलं आहे. त्यांनी श्रीदेवीच्या काही चित्रपटांचंही कौतुक केलं आहे. यावेळी त्यांनी श्रीदेवी आणि जान्हवी कपूर यांच्यात होणाऱ्या तुलनेबद्दल मत व्यक्त केलं आहे.

राम गोपाल वर्मा यांची जान्हवी कपूरबद्दल प्रतिक्रिया

राम गोपाल वर्मा याबद्दल म्हणाले, “जान्हवी कपूरमध्ये श्रीदेवी कुठेच दिसत नाही. ती श्रीदेवीसारखी नाही आणि माझी तिच्याबरोबर काम करण्याची काही इच्छाही नाही.” अद्याप यावर जान्हवी कपूरने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ती अनेकदा मुलाखतींमध्ये तिच्या आईच्या सिनेमांचं कौतुक करीत असते.

जान्हवीनंतर नुकतीच तिची बहीण व श्रीदेवी यांची धाकटी मुलगी खुशी कपूरनेही बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे. तिने जोया अख्तरच्या ‘द अर्चिज’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ती करण जोहरच्या ‘नादानियां’मध्ये झळकली.

श्रीदेवी ९०च्या काळातील लोकप्रिय अभिनेत्री होती. त्यावेळी तिने काम केलेले सिनेमे आजही लोक आवडीने पाहताना दिसतात. तर तिच्यानंतर आता त्यांच्या दोन्ही मुली अभिनय क्षेत्रात सक्रिय आहेत. दोघीही त्यांच्या आईप्रमाणे इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करू पाहत आहेत.