दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासच्या ‘आदिपुरुष’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्यावर बरीच टीका होताना दिसत आहे. चित्रपटात दाखवण्यात आलेला रावणाचा लूक कोणालाच आवडलेला नाही. अगदी सोशल मीडिया युजर्सपासून ते स्टार कलाकारांपर्यंत सर्वांनीच यावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता रामायणात श्रीरामाची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल यांनी या चित्रपटाच्या टीझरबाबत आपलं मत मांडलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘रामायण’ फेम अरुण गोविल यांनी त्याच्या युट्यूब चॅनेलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी ‘आदिपुरुष’ चित्रपटाच्या टीझरवर त्यांचं मत स्पष्ट केलं आहे. अनेकांनी या टीझरमधून लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचा आरोप केला आहे. जेव्हा याबाबत अरुण गोविल यांनी विचारण्यात आलं होतं तेव्हा त्यांनी यावर बोलण्यास नकार दिला होता मात्र आता त्यांनी या टीझरबाबत त्यांना काय वाटतं हे सांगितलं आहे. युट्यूबवर व्हिडीओ शेअर करताना त्यांनी म्हटलंय, “मागच्या काही काळापासून डोक्यात बऱ्याच गोष्टी आहेत. ज्या तुमच्या सर्वांशी शेअर करण्याची वेळ आता आली आहे.”

आणखी वाचा- ना प्रभास, ना सैफ, ‘आदिपुरुष’ टीझरनंतर ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याचं होतंय कौतुक; काय आहे कारण?

अरुण गोविल यांनी आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय, “रामायण, महाभारत किंवा असे जे काही ग्रंथ किंवा शास्त्र आहेत ते सर्व आपला धार्मिक वारसा आणि संस्कृती आहेत. हे ग्रंथ आपल्या संस्कृतीचा पाया आहेत. त्यामुळे हा पाया हलवला जाऊ शकत नाही किंवा त्याचा धक्का लागेल असं काही करता येऊ शकत नाही. संस्कृतीच्या पायाशी किंवा मूळांशी कोणत्याही प्रकारची मोडतोड करणं चुकीचं आहे. शास्त्रातून आपल्याला संस्कार मिळतात, जगण्याचा एक दृष्टीकोन मिळतो.”

चित्रपटाचे निर्माते, लेखक यांच्याबद्दल बोलताना अरुण गोविल म्हणाले, “तुम्हाला आमचा धार्मिक पाया आणि संस्कृती याची मोडतोड करण्याचा काहीच अधिकार नाही. क्रिएटीव्हिटीच्या नावाखाली धर्माची खिल्ली उडवू नका.” दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटाचा टीझर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित झाला. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. पण टीझर प्रदर्शित झाल्यावर नेटकऱ्यांनी यावर नाराजी व्यक्त केली आहे. चित्रपटातील व्हीएफएक्स आणि रावणाचा लूक यावर सोशल मीडियावरून बरीच टीका होताना दिसत आहे. सैफने साकारलेल्या रावणाच्या व्यक्तिरेखेचा लूक कोणालाच आवडलेला नाही. त्यावरून बराच वाद सुरू आहे. येत्या १२ जानेवारीला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramayan fame arun govil reacts on adipurush teaser mrj
First published on: 08-10-2022 at 11:00 IST