Vidhu Vinod Chopra Talked About Ranbir Kapoor : विधू विनोद चोप्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय दिग्दर्शकांपैकी एक आहेत. आजवर त्यांनी अनेक गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन, तसेच निर्मिती केली आहे. ते अनेकदा इंडस्ट्रीतील गोष्टींबद्दल ठामपणे त्यांची मतं व्यक्त करीत असतात. त्यांनी बॉलीवूड अभिनेता रणबीर कपूरबद्दलही प्रतिक्रिया दिलेली.
रणबीर कपूर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहेत. सध्या तो त्याच्या ‘रामायण’ व ‘लव्ह अँड वॉर’ या आगामी चित्रपटांमुळे चर्चेत आहे. आजवर त्यानेही अनेक हिट चित्रपटांत काम केलं आहे. परंतु, असं असलं तरी विधू विनोद चोप्रा यांना मात्र रणबीरनं निवड केलेले चित्रपट फार आवडले नसल्याचे त्यांनी दिलेल्या प्रतिक्रियेतून कळतं.
विधू विनोद चोप्रा व रणबीर कपूर यांनी अभिनेता संजय दत्तच्या चरित्रपटात ‘संजू’मुळे एकत्र काम केलेलं. त्यामध्ये रणबीरनं संजय दत्तची भूमिका साकारलेली, तर विधू विनोद चोप्रा यांनी त्याची निर्मिती केलेली. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार त्यावेळी विधू विनोद चोप्रा रणबीरबद्दल एका कार्यक्रमात म्हणालेले, “मी जेव्हा विचारलं की, चित्रपटात संजूची भूमिका कोण साकारणार? तेव्हा टीममधील सगळ्यांनी मला रणबीर कपूरचं नाव सुचवलं. त्यांनी त्याचे तसे लूक्स दाखवले आणि खरंच सांगतो मी त्याला ओळखू शकलो नाही. मी संजयला खूप जवळून ओळखत असूनही.”
रणबीर कपूरबद्दल विधू विनोद चोप्रा यांची प्रतिक्रिया
रणबीरबद्दल पुढे ते म्हणाले, “त्यामुळे या चित्रपटातून लोकांना कळेल की, रणबीर आपल्या देशातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्यांपैकी एक आहे. मी अशी व्यक्ती आहे, जो उगाच कौतुक करीत नाही. त्यामुळे मी हेही सांगू शकतो की, त्याची चित्रपटांची निवड करण्याची पद्धत फार चांगली नाहीये. तो त्या बाबतीत मूर्ख आहे.”
विधू विनोद चोप्रा यांनी केलेल्या टीकेनंतर जेव्हा रणबीर कपूरला याबद्दल विचारण्यात आलेलं तेव्हा त्यानं त्याबद्दल प्रतिक्रिया देत म्हटलेलं, “जर प्रत्येक कलाकाराला कळलं असतं की, नेमकं त्याला काय करायचं आहे तर मग प्रत्येक जण सुपरस्टार झाला असता. हे खूप कठीण आहे आणि मी माझ्या चुकांमधून शिकण्याचा प्रयत्न करतोय.”
‘संजू’ हा चित्रपट करण्यापूर्वी रणबीर कपूर कठीण काळातून जात होता. त्यानं काम केलेले ‘बॉम्बे वेलवेट’, ‘बेशरम’, ‘तमाशा’, ‘रॉय’, ‘जग्गा जासूस’ यांसारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपयशी ठरले. त्यानंतर त्यानं ‘संजू’मध्ये काम केलं आणि हा चित्रपट हिट झाला. त्यामुळे ‘संजू’ रणबीर कपूरच्या करिअरमधील महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक आहे.