बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ चित्रपट सध्या चांगलाच चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला. यामध्ये रणबीरचे हिंस्त्र रुप बघायला मिळाले. भरपूर ॲक्शनने भरलेल्या या टीझरला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. याबरोबरच यातील गाणीही सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होत आहेत. भारताबरोबर परदेशातही या चित्रपटाची क्रेझ बघायला मिळत आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर या ट्रेलरची जबरदस्त चर्चा आहे. रणबीरचा आत्तापर्यंतचा सर्वात जबरदस्त आणि हिंस्र अवतार लोकांना प्रचंड आवडला आहे. नुकतंच या ट्रेलर लॉंचदरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांनी रणबीरचं तोंडभरून कौतुक केलं आहे. जगातील सर्वोत्तम ३ अभिनेत्यांचं मिश्रण म्हणजे रणबीर कपूर असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.

आणखी वाचा : Animal Trailer: वडील-मुलाचं एक विचित्र नातं अन् रक्तपात; रणबीर कपूरच्या बहुचर्चित ‘अ‍ॅनिमल’चा ट्रेलर प्रदर्शित

रणबीरबरोबर काम करतानाचा अनुभव आणि एकूणच त्यातील कलागुण याविषयी बोलताना संदीप म्हणाले, “रणबीर हा एक उत्कृष्ट अभिनेता आहे, सगळ्यांपेक्षा हटके आहे. मला असं वाटतं की बऱ्याच महान अभिनेत्यांचं तो एक मिश्रण आहे. खरंतर त्यांच्याशी तुलना करणं योग्य नाही, पण मला असं वाटतं की रणबीर हा रॉबर्ट डी नीरो, अल पचीनो आणि कमल हासन या तीन उत्कृष्ट अभिनेत्यांचं योग्य मिश्रण आहे. रणबीरच्या अभिनयाला कसल्याही मर्यादा नाहीत.”

चित्रपटातील पात्राप्रमाणे तो अजिबात नाही, त्याला राग येत नाही, तो फार शांत असल्याचंही संदीप यांनी स्पष्ट केलं. पुढे ते म्हणाले, “मी रणबीरचा रॉकस्टार एकाच दिवशी दोन वेळा पाहिला अन् लगेच मी त्याला फोन करून मला त्याचं काम आवडल्याचं सांगितलं. मी त्याच्याबरोबर काम करेन हा विचार मी कधीच केला नव्हता. रणबीरनेच ‘कबीर सिंह’पाहून माझ्याकडे चित्रपट करायचा प्रस्ताव ठेवला होता, खरंतर त्याआधी जेव्हा ‘अर्जुन रेड्डी’ आला होता तेव्हाच त्याने मला मेसेज केला होता परंतु माझ्याकडून तो मेसेज पाहिला गेला नव्हता. मला त्याचं वाईट वाटतं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या चित्रपटाला सेन्सॉरकडून ‘ए’ सर्टिफिकेट मिळालं असून चित्रपटाची लांबी ही ३ तास २१ मिनिटं अशी असल्याचं खुद्द संदीप रेड्डी वांगा यांनीच स्पष्ट केलं आहे. रणबीरचा हा सगळ्यात वेगळा अवतार मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते फारच उत्सुक आहेत. या ट्रेलरलाही लोकांनी पसंत केलं आहे. १ डिसेंबरला हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, कन्नड, मल्याळम अशा ५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी विकी कौशलचा ‘सॅम बहादुर’सुद्धा प्रदर्शित होणार असल्याने बॉक्स ऑफिसवर एक जबरदस्त टक्कर पाहायला मिळणार आहे.