Ranbir Kapoor Said No To Kishore Kumar’s Biopic For Ramayana : रणबीर कपूर ‘रामायण’ चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहे. अभिनेता या चित्रपटात रामाच्या भूमिकेत दिसणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून या चित्रपटाबद्दल चर्चा सुरू आहे. हा चित्रपट त्याच्यासाठी महत्त्वाच्या चित्रपटांपैकी एक ठरेल. परंतु, ‘रामायण’साठी रणबीरने एका चित्रपटाला नकार दिल्याचं समोर आलं आहे.
‘रामायण’ चित्रपटासाठी रणबीरने एका चित्रपटाला नकार दिला असून याबाबत चित्रपटाच्या दिग्दर्शकाने सांगितलं आहे. ‘बीबीसी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिग्दर्शक अनुराग बासूने रणबीर कपूरबद्दल सांगितलं आहे. नितेश तिवारींच्या ‘रामायण’साठी अभिनेत्याने दिवंगत गायकाच्या चरित्रपटासाठी नकार दिल्याचं त्याने म्हटलं आहे.
रामायणसाठी रणबीर कपूरने किशोर कुमार यांच्या बायोपिकला दिला नकार
अनुराग बासू म्हणाला, “रणबीरला दोन चित्रपटांपैकी एकाची निवड करायची होती. किशोर कुमार यांचा बायोपिक किंवा ‘रामायण’ या दोन चित्रपटांपैकी त्याला एक निवडायचं होतं. त्याच्यासाठी हा निर्णय घेणं कठीण होतं. शेवटी त्याने ‘रामायण’ची निवड केली. मला वाटतं त्याने योग्य निर्णय घेतला.”
रणबीर कपूर व अनुराग बासू यांनी यापूर्वी अनेक चित्रपटांत काम केलं आहे. ‘बर्फी’, ‘जग्गा जासूस’ या चित्रपटांच्या निमित्ताने दोघांनी एकत्र काम केलं होतं. दोघांनाही पुन्हा एकत्र काम करण्याची इच्छा असल्याचं दिग्दर्शकाने मुलाखतीमधून सांगितलं आहे. तो म्हणाला, “आम्ही एकत्र काम करता यावं यासाठी प्रयत्नशील असतो, पण तसं काही घडत नाहीये.”
किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये रणबीर कपूरने काम करण्यास नकार दिल्यानंतर आमिर खान या चित्रपटात किशोर कुमार यांची भूमिका साकारणार असं म्हटलं जात आहे, परंतु दिग्दर्शकाने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
‘मिड डे’शी संवाद साधताना अनुराग म्हणाला, “जोवर करार होत नाही, गोष्टी मार्गी लागत नाही, याबद्दल काहीही सांगणं मला योग्य वाटत नाही. या प्रॉजेक्टमध्ये अनेक अडचणी आल्या आहेत, त्यामुळे मी प्रार्थना करत आहे की यावेळी तरी ते होईल; गेल्या एक दशकापासून मी याकरता प्रयत्न करत आहे.”