मुंबई ते दिल्ली ठिकठिकाणी आपल्या चित्रपटाच्या चमूसह फिरणारा अभिनेता रणबीर कपूर हा सध्या चर्चेचा विषय आहे. त्याची मुख्य भूमिका असलेल्या ‘अॅनिमल’ या संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित चित्रपटाचा ट्रेलर प्रकाशित झाल्यापासून त्याच्या या आगळय़ावेगळय़ा भूमिकेविषयी चर्चा सुरू झाली आहे. संदीप रेड्डी वांगाचे ‘अर्जुन’ आणि ‘कबीर सिंग’ हे दोन्ही चित्रपट पाहता त्यांचे नायक हे काहीसे हिंसक, आक्रमक स्वभावाचे असतात. ‘अॅनिमल’ चित्रपटातील रणबीरने साकारलेला नायकही याच धाटणीचा असल्याचे ट्रेलरवरून लक्षात येते. ट्रेलर लाँचच्या निमित्ताने प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधणाऱ्या रणबीरला त्याच्या भूमिकेविषयी विचारणा झाली तेव्हा जाणीवपूर्वक अशी व्यक्तिरेखा स्वीकारल्याचे रणबीरने स्पष्ट केले. प्रेमी नायक म्हणून त्याला प्रेक्षकांकडून कायम चांगला प्रतिसाद मिळाला आहे, आता त्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्याने सांगितले.
‘अॅनिमल’ च्या ट्रेलर लाँच कार्यक्रमासाठी रणबीर कपूरबरोबर अभिनेत्री रश्मिका मंदाना, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा आणि निर्माते भूषण कुमार उपस्थित होते. यावेळी रणबीर कपूरने हा चित्रपट करण्यामागचे कारण सांगताना नेहमीपेक्षा वेगळय़ा भूमिकेचे आव्हान स्वीकारण्यासाठी हा चित्रपट करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. या चित्रपटातील त्याच्या व्यक्तिरेखेबद्दल तो म्हणाला, ‘माझी ओळख चॉकलेट बॉय, लव्हरबॉय अशी झाली आहे. प्रेक्षकांनी मी साकारलेल्या ‘ये जवानी है दिवानी’ मधील बनी, ‘बर्फी’, ‘तू झुठीं मैं मक्कार’ मधील रोहन अरोरा या व्यक्तिरेखांवर भरभरून प्रेम केले त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. पण, कलाकार म्हणून माझी ओळख या भूमिकांपुरती मर्यादित राहू नये असे मला वाटते. माझ्या या परिचित प्रतिमेपेक्षा वेगळं काही नवीन आव्हानात्मक भूमिकेच्या दृष्टीने मी प्रयत्न करतो आहे. ‘अॅनिमल’ चित्रपटाच्या निमित्ताने आव्हानात्मक भूमिकेची संधी माझ्याकडे आली आणि मी ती स्वीकारली.’
हेही वाचा >>>छोटा पडदा गाजवणाऱ्या ‘जुळून येती रेशीमगाठी’ला १० वर्ष पूर्ण! प्राजक्ता माळी म्हणाली, “महाराष्ट्रातील सगळ्या पोरींना…”
या चित्रपटात मी साकारलेली व्यक्तिरेखा काही अंशी कठोर, बेफिकीर अशी आहे. मात्र केवळ नकारात्मक छटा यात नाहीत तर अधिक गुंतागुंतीची भावना असलेली अशी व्यक्तिरेखा आहे. मी आजवर ज्या भूमिका केल्या त्याप्रमाणेच ‘अॅनिमल’मधील भूमिकाही प्रेक्षकांना आवडेल असा माझा विश्वास आहे, असे रणबीर पुढे म्हणाला. हा चित्रपट गुन्हेगारी विश्वातील नाटय़ावर आधारित असला तरी बाप आणि मुलाचे नाते हे या कथेच्या केंद्रस्थानी असल्याचेही त्याने सांगितले. रणबीरबरोबर नायिका म्हणून दाक्षिणात्य अभिनेत्री रश्मिका मंदानाने काम केले आहे. प्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर आणि बॉबी देओल यांच्याही चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका आहेत. १ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार असून सध्या तरी रणबीरच्या चाहत्यांना त्याच्या या भूमिकेविषयी उत्सुकता आहे. अनिल कपूर, बॉबी देओल यांच्या वेगळय़ा भूमिका आणि दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगाची चित्रपटशैली आवडणाऱ्यांनाही ‘अॅनिमल’बद्दल उत्कंठा आहे.
‘बदतमीज दिल’ नको..
रणबीरने म्हटल्याप्रमाणे त्याची प्रेमी नायक ही ओळख सगळय़ांच्या अधिक आवडीची आहे. त्याची नृत्याची शैली आणि खास त्याच्या नृत्यामुळे हिट झालेली गाणी अशी चांगली यादी आहे. ‘अॅनिमल’च्या प्रसिद्धीसाठी दिल्लीत पोहोचलेल्या रणबीरला ‘बदतमीज दिल’ गाण्यावर नाचण्याची फर्माईश करण्यात आली. ‘यह जवानी है दिवानी’ चित्रपटातील बन्नीवर चित्रित झालेले ‘बदतमीज दिल’ हे गाणे आजही लोकप्रिय आहे. ते गाणे आजही आपल्याला चिकटलेले आहे असे रणबीर म्हणतो. मी जिथे जिथे जातो तिथे तिथे मला या गाण्यावर नृत्य करण्याची फर्माईश केली जाते. पण हा चित्रपट केला तेव्हा मी खूप तरुण होतो. आता मी ४१ वर्षांचा आहे. चित्रपटात जसे नृत्य केले होते आता त्या पद्धतीने नृत्य मला जमत नाही. कंबर दुखते. त्यामुळे मी सगळय़ांनाच विनंती करतो, कृपा करून मला ‘बदतमीज दिल’ या गाण्यावर नाचायला लावू नका, असे रणबीरने सांगितले.