Rani Mukerji On Awards : बॉलीवूड अभिनेत्री राणी मुखर्जीला तिच्या ३० वर्षांच्या अभिनय कारकिर्दीत पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटासाठी तिला सर्वोत्तम अभिनेत्रीचा २०२५ चा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. दिल्लीतील राष्ट्रपती भवनात नुकताच हा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला. या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्व स्तरांतून अभिनेत्रीवर शुभेच्छा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

राणीच्या या पहिल्या राष्ट्रीय पुरस्काराबद्दल सर्वत्र तिचं कौतुक होत असतानाच इतर कलाकारांना पुरस्कार न मिळण्याबाबत काही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. काही वर्षांपासून अनेक मोठ्या पुरस्कारांच्या निवडींवरून वाद होत आले आहेत. त्यावर राणीचं मत आहे की, जर एखाद्या पुरस्कारावरच शंका घेतली जाऊ लागली, तर त्या पुरस्काराची काहीच किंमत उरत नाही.

३० वर्षांनंतर मिळालेला पुरस्कार खूपच खास : राणी मुखर्जी

ANI बरोबरच्या एका पॉडकास्टमध्ये अभिनेत्री राणी मुखर्जीने तिच्या पुरस्कारानंतरच्या भावना व्यक्त केल्या. ती म्हणाली, “३० वर्षांनंतर मिळालेला हा पुरस्कार माझ्यासाठी अतिशय खास आहे. त्यासाठी संपूर्ण देशाने आणि देशभरातील चाहत्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. ते कायमच आमच्या पाठीशी राहिले.”

राणी पुढे म्हणाली, “या वर्षी शाहरुख खानलाही त्याचा पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. आम्हा दोघांसाठीही हा अनुभव खूप समाधानकारक होता. कारण- जेव्हा तुम्हाला पुरस्कार मिळतो आणि लोक म्हणतात की, ‘तिला तो मिळायला नको होता’, तेव्हा त्या पुरस्काराला काही अर्थ उरत नाही. पण जेव्हा लोक असं म्हणतात की, ‘या पुरस्कारासाठी तीच पात्र होती’, तेव्हा आम्हा कलाकारांना खरा आनंद होतो आणि समाधान मिळतं.”

पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी महत्त्वाचंच : राणी मुखर्जी

या संवादात राणीनं कलाकारांसाठी पुरस्काराचं महत्त्व काय असतं? यावरही प्रतिक्रिया दिली. याबद्दल ती म्हणाली, “प्रत्येक कलाकारासाठी पुरस्काराचं महत्त्व हे असतंच. मी प्रेक्षकांसाठी काम करते. माझं काम त्यांना आवडावं म्हणून मी इतकी मेहनत करते. जेव्हा मला एखादा पुरस्कार मिळतो, तेव्हा ते आनंदित होतात आणि त्यांना माझे चाहते किंवा प्रेक्षक असल्याचा अभिमान वाटतो. त्यामुळे हो… पुरस्कार मिळणं हे कलाकारासाठी खूप खास असतं.”

राणी मुखर्जीनं याआधी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्री’साठीचे काही पुरस्कार जिंकले आहेत; मात्र राष्ट्रीय पुरस्कार तिला पहिल्यांदाच मिळाला. असंच काहीसं शाहरुख खानच्याही बाबतीत घडलं. त्यालाही ‘जवान’ या चित्रपटासाठी ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.