अभिनेता रणवीर सिंह आणि अभिनेत्री आलिया भट्टचा बहुचर्चित चित्रपट ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ शुक्रवारी (२८ जुलै) सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. रणवीर आणि आलियाच्या जोडीला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान रणवीर आणि आलियाच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.
हेही वाचा- ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? आकडेवारी आली समोर
‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ चित्रपट ऑनलाइन लीक झाला आहे. हा चित्रपट टोरेंट वेबसाइटवर लीक झाला आहे. चित्रपट लीक झाल्यामुळे या चित्रपटाच्या कमाईवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. टोरेंट वेबसाइटप्रमाणे अशा अनेक ऑनलाइन वेबसाइट्स आहेत जिथे हा चित्रपट लीक झाला आहे.
नुकतेच चित्रपटाच्या पहिल्या दिवशीच्या कमाईचे आकडे समोर आले होते. सॅकनिल्क’च्या अर्ली ट्रेंड रिपोर्ट्सनुसार, चित्रपटाने पहिल्या दिवशी ११.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे. करण जोहरचा कमबॅक असलेल्या या चित्रपटात रणवीर आलियासह, धर्मेंद्र, जया बच्चन, शबाना आझमी यांच्यासारखी तगडी स्टारकास्ट आहे.
१७८ कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने प्रदर्शनापूर्वीच बक्कळ कमाई केली होती. या चित्रपटाचे ओटीटी हक्क ॲमेझॉन प्राईम व्हिडीओला ८० कोटींना विकण्यात आले आहेत. याचबरोबर या चित्रपटाचे सॅटेलाइट अधिकार ५० कोटींना ‘कलर्स’ला विकण्यात आले आहेत. तर ‘सारेगमप’ला या चित्रपटाच्या गाण्यांचे हक्क ३० कोटींना विकण्यात आले आहेत. ही सगळी किंमत पकडून या चित्रपटाने प्रदर्शनाच्या आधीच १६० कोटींची कमाई केली आहे.