Ranvir Shorey on Relationship: बॉलीवूड अभिनेता रणवीर शौरी अनेकदा त्याच्या खासगी आयुष्याबद्दल बोलत असतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्याने रिलेशनशिप व प्रेम यावर वक्तव्य केले आहे.

अभिनेत्याने नुकतीच डिजिटल कॉमेंट्रीला मुलाखत दिली. या मुलाखतीत त्याला विचारले की, आताही तो डेट करण्यास तयार आहे का? यावर अभिनेत्याने होकार देत, त्याचे बंबल या डेटिंग अॅपवर प्रोफाइल असल्याचे सांगितले. याबरोबरच तो असेही म्हणाला की, प्रेमाच्या बाबतीत मी १९ व्या वर्षापासूनच दुर्देवी आहे. तसेच सध्या रिलेशनशिपमध्ये येणाऱ्या अडचणींबाबतही त्याने खुलासा केला.

अभिनेता काय म्हणाला?

तो म्हणाला, “स्त्री व पुरुषाच्या भूमिकांबाबत ज्या परिभाषा होत्या, त्या परिभाषांबद्दल पुन्हा एकदा विचार करणे गरजेचे आहे. आपण अलीकडच्या काळात कितीतरी अशा बातम्या वाचल्या आहेत की पत्नीने तिच्या एक्स-बॉयफ्रेंडबरोबर मिळून पतीचा खून केला, पतीने कुटुंबाबरोबर मिळून पत्नीचा खून केला. तसंही मी प्रेमात नशीबवान नाही आणि प्रेमात गुंतवणूक करावी, वेळ द्यावा असा आताचा काळ राहिला नाही.”

तो पुढे असेही म्हणाला, “जेव्हा मंदीचे मार्केट असते, तेव्हा गुंतवणूकदार पैसे गुंतवत नाही. तसेच, सध्या प्रेमाच्या बाजारात मंदी आहे. त्यामुळे सध्या यामध्ये कोणतीही गुंतवणूक करू नका. आजचा काळच तसा आहे. जिथे पत्नी म्हणते की एक्स बॉयफ्रेंड हा कुटुंबाचा भाग आहे. विशेष म्हणजे तुम्ही तिला काही बोलू शकत नाही, कारण तिला पाठिंबा देणारे १० लोक असतात; जे म्हणतात की ती काय चुकीचे बोलत आहे? त्यामुळे हा मंदीचा काळ आहे, त्यामुळे घरी बसा आणि स्वत:वर लक्ष द्या. शरीर तंदुरुस्त ठेवण्यावर भर द्या.”

दरम्यान, रणवीर शौरीच्या खासगी आयुष्याबाबत बोलायचे तर त्याने पूजा भट्टला डेट केले आहे. २००० च्या दशकाच्या सुरुवातीला ते रिलेशनशिपमध्ये होते, मात्र ते वेगळे झाले. त्यानंतर अभिनेत्याने कोंकणा सेन शर्माबरोबर २०१० मध्ये लग्नगाठ बांधली. २०११ मध्ये त्यांना मुलगा झाला. त्यानंतर त्यांना त्यांच्या नात्यात अडचणी जाणवू लागल्या. त्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. २०१५ मध्ये ते वेगळे झाले. त्यांनी २०२०मध्ये घटस्फोट घेतला.

अभिनेत्याच्या कामाबद्दल बोलायचे तर तो चांदणी चौक टू चायना, तितली, मेट्रो पार्क अशा चित्रपटांमध्ये दिसला आहे. तसेच त्याने काही वेब सीरिजमध्ये काम केले आहे.