Rasha Thadani Dance : रवीना टंडनच्या १९ वर्षांच्या लेकीने म्हणजेच राशा थडानीने ‘आझाद’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात राशाने ‘उई अम्मा’ गाण्यावर जबरदस्त एक्स्प्रेशन्स देत डान्स केला आहे. राशाच्या पहिल्या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर फारसं यश मिळालं नसलं, तरीही यामधील ‘उई अम्मा’ हे गाणं सर्वत्र व्हायरल होत आहे. याशिवाय ‘उई अम्मा’वर डान्स करताना राशाने कमाल एक्स्प्रेशन्स दिल्या आहेत. यामुळे रवीनाच्या लेकीचं सध्या सर्वत्र कौतुक केलं जात आहे.

राशा इतर नेपोकिड्सपेक्षा खूपच चांगला अभिनय करते, तिचं नृत्यकौशल्य सुद्धा खूप सुंदर आहे अशा प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी राशाला रुपेरी पडद्यावर पाहून दिल्या आहेत. मात्र, ही स्टारकिड सध्या आणखी एका गोष्टीमुळे चर्चेत आली आहे. ती गोष्ट म्हणजे… ‘उई अम्मा’ गाण्यावर जबरदस्त डान्स केल्यावर आता राशा विकी कौशलच्या ‘तौबा तौबा’ गाण्यावर थिरकली आहे. यामध्ये तिला प्रसिद्ध कोरिओग्राफर बॉस्को मार्टिसने साथ दिली आहे.

विकी कौशलच्या २०२४ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटात ‘तौबा तौबा’ गाणं आहे. या गाण्यात विकी एक विशिष्ट हूकस्टेप करतो. हे गाणं प्रदर्शित होताच सर्वत्र विकीच्या हूकस्टेपसह डान्सची चर्चा रंगली होती. मनोरंजन विश्वातील असंख्य कलाकारांनी ‘तौबा तौबा’ गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं होतं. आता राशाला पुन्हा एकदा या गाण्याची भुरळ पडली आहे. राशाने ‘तौबा तौबा’वर डान्स करताना विकीप्रमाणे हुबेहूब हूकस्टेप केली आहे.

‘तौबा तौबा’ आणि ‘उई अम्मा’ या दोन्ही गाण्यांचे कोरिओग्राफर बॉस्को मार्टिस आहेत. त्यामुळे राशाचा भन्नाट डान्स पाहून या व्हिडीओवर विकी कौशलने एक खास कमेंट केली आहे. “आता बॉस्को सर ( कोरिओग्राफर ) माझ्याकडून ‘उई अम्मा’ गाण्यावर डान्स करून घेऊदे नको म्हणजे मिळवलं. राशा तू खूपच सुंदर आणि Smooth डान्स केलास, अशीच प्रगती कर.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याशिवाय राशाच्या व्हिडीओवर माधुरी दीक्षितने सुद्धा फायर इमोजी देत तिचं कौतुक केलं आहे. राशा थडानीचा हा डान्स व्हिडीओ सर्वत्र व्हायरल होत असून, अवघ्या तीन दिवसांत या व्हिडीओला ९० लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.