रवीना टंडनची लेक राशा थडानीने ‘आझाद’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. राशाने तिची आई रवीनाच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. राशासह गेल्या काही वर्षांमध्ये अनेक बड्या कलाकारांच्या मुलांनी बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं, यामुळे अनेकदा स्टार किड्समध्येही स्पर्धा असल्याचं म्हटलं जातं. अशातच राशाने जान्हवी कपूर व सुहाना खान यांच्याबरोबर होणाऱ्या तुलनेबाबत मत मांडलं आहे.
‘फिल्मी ग्यान’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये राशाने याबाबत सांगितलं आहे. ‘आझाद’ चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने राशाने मुलाखत दिली होती. सोशल मीडियावर एका नेटकऱ्याने रवीना टंडनची मुलगी जान्हवी, सुहानाला टक्कर द्यायला आली आहे अशी कमेंट केली होती. याबाबत राशाला मुलाखतीमध्ये विचारण्यात आलं होतं. यावर ती म्हणाली, “मला असं वाटतं, त्या माझ्यापेक्षा खूप जास्त अनुभवी आहेत. त्यांनी माझ्यापेक्षा जास्त काम केलं आहे, त्यामुळे त्यांच्याकडून खूप काही शिकण्यासारखं आहे असं वाटतं. म्हणून मला मी त्यांच्यासह कुठल्या स्पर्धेत आहे असं वाटत नाही”.
राशाने ‘आझाद’ या चित्रपटातून अमन देवगणसह पदार्पण केलं. अजय देवगणचा भाचा अमनचाही हा पहिलाच चित्रपट. यामध्ये अजय देवगण महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. १७ जानेवारी २०२५ रोजी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर खास कमाई केली नाही. पण, यातील ‘उई अम्मा’ हे गाणं मात्र खूप व्हायरल झालं होतं. यातील राशाच्या नृत्याने अनेकांचं लक्ष वेधलं. या गाण्यातील तिच्या नृत्यासाठी तिचं अनेकांनी कौतुक केलं. गाण्यातील तिचं नृत्य पाहून अनेकांना तिची आई प्रसिद्ध अभिनेत्री रवीना टंडनच्या गाण्याची आठवण झाली. आईप्रमाणे राशासुद्धा उत्तम नृत्यांगणा असल्याचं अनेकांनी म्हटलं.
रवीना टंडनला एक मुलगी व एक मुलगा अशी दोन मुलं आहेत. या दोन्ही मुलांसह रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. तिच्या या दोन्ही दत्तक मुलींची लग्न झाली असून त्यांनाही मुलं झाली आहेत. याबाबत नुकतंच रवीनाने फराह खानशी संवाद साधताना म्हटलं होतं. राशा थडानीबद्दल बोलायचं झालं, तर तिने वयाच्या १९व्या वर्षी तिच्या पहिल्या चित्रपटातून अभिनयक्षेत्रात पदार्पण केलं. राशा आता २० वर्षंची असून ती अभिनय क्षेत्रासह तिचं पुढील शिक्षण पूर्ण करत आहे.