Bollywood Actress’s husband died before divorce: अनेकदा आपण पाहतो की, आयुष्यात आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टींची अपेक्षा असते. मात्र, प्रत्यक्षात आपल्याबरोबर त्यापेक्षाही वेगळ्या गोष्टी घडतात. आता बॉलीवूडच्या लोकप्रिय अभिनेत्रीबरोबरही असेच काहीसे घडल्याचे पाहायला मिळत आहे.
या अभिनेत्रीला एक चांगली पत्नी आणि एक चांगली आई व्हायचे होते. पण जेव्हा ती मोठी झाली, तेव्हा मात्र तिला वेगळे अनुभव आले. तिला जे तिच्या आयुष्यात पाहिजे होते, त्या गोष्टी कधी प्रत्यक्षात झाल्याच नाहीत. या अभिनेत्रीचे नाव भानुरेखा असे आहे. संपूर्ण जग तिला रेखा या नावाने ओळखते.
“जेव्हा आमच्या दोघांच्या…”
रेखा यांचा जन्म विवाहबाह्य संबंधातून झाला होता. त्यांच्या वडिलांनी त्यांना कधीच स्वीकारले नाही. १३ व्या वर्षी त्यांना अशा व्यवसायात काम करण्यास सांगितले गेले, जिथे त्यांचा वारंवार छळ केला जात असे. रेखा व अमिताभ बच्चन यांची नावे एकमेकांशी जोडली गेली. आजही रेखा व जया बच्चन यांची तुलना होताना दिसते. पुढे रेखा यांनी दिल्लीतील एका व्यावसायिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न करून त्या आयुष्याची एक नवीन सुरुवात करतील, असे त्यांना वाटले होते. मात्र, त्या गोष्टीचा शेवटही वाईट झाला.
१९९० च्या सुरुवातीला रेखा आणि मुकेश अग्रवाल यांची एकमेकांशी भेट झाली. यादरम्यानच्या काळात रेखा यांना चित्रपटांपासून ब्रेक हवा होता. काही काळ डेट केल्यानंतर रेखा व मुकेश अग्रवाल यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला; परंतु लग्नानंतर त्यांच्यातील मतभेद वाढत होते. काही महिन्यांनंतर त्यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला. त्याबद्दल मुकेश यांनी पहिल्यांदा घटस्फोटाचा विचार बोलून दाखवल्याचे रेखा यांनी वक्तव्य केले होते.
‘फिल्मफेअर’ला दिलेल्या मुलाखतीत रेखा यांनी स्पष्ट केले होते, “समोरील गोष्टींकडे बघण्याच्या आमच्या दृष्टिकोनात आणि आमच्या स्वभावात मोठा फरक होता. आमच्या नात्यात एक टप्पा आला जेव्हा आमच्या दोघांच्या लक्षात आले की, आमच्यात असलेली विसंगती दूर करणे अशक्य आहे. त्यामुळे आम्ही परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. “
रेखा व मुकेश यांनी घटस्फोटाचे पेपर तयार केले होते. मात्र, कायदेशीररित्या ते वेगळे होण्यापूर्वीच मुकेश यांनीआत्महत्या केली. मुकेश अग्रवाल यांच्या मृत्यूनंतर रेखा यांना लोक चेटकीण म्हणून हिणवू लागले. त्यांच्याबाबत मोठ्या प्रमाणात वाईट बोलले जात होते. त्यानंतर रेखा यांनी एक मुलाखत दिली होती, ज्याचे शीर्षक ‘मी मुकेशला मारले नाही’, असे होते.
सिमी गरेवालला दिलेल्या मुलाखतीत रेखा म्हणालेल्या, मी आता खरंच मोठी झाली आहे. हे ऐकायला विचित्र किंवा भयानक वाटेल; पण माझ्याबरोबर घडलेली ही सर्वांत महत्त्वपूर्ण घटना आहे. कारण- त्यामुळे लोक कसे असतात, याचा क्रॅश कोर्स मला मिळाला.
मुकेश अग्रवाल यांच्या निधनानंतर त्या ज्या परिस्थितीतून गेल्या, त्याची त्यांनी माहिती दिली. “त्यावेळी मी माझ्या भावनांच्या वेगवेगळ्या टप्प्यातून गेले. आधी मला धक्का बसला. नंतर घडणाऱ्या गोष्टींबाबत विश्वास बसत नव्हता. हे माझ्याबरोबर घडू शकत नाही, असेही वाटू लागले. जे घडत होते ते स्वीकारण्यासाठी माझे मन तयार नव्हते. नंतर राग येऊ लागला. माझी काय चूक आहे, असे वाटू लागले. माझा कधीच कोणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, असा विचार येऊन मला स्वत:चीच दया येऊ लागली. मग हळूहळू मी परिस्थिती समजून घेऊन, ती स्वीकारली”, असे म्हणत रेखा यांनी त्यांच्या आयुष्यातील कठीण काळाबद्दल सांगितले होते.
दरम्यान, मुकेश अग्रवाल यांच्या निधनानंतर रेखा यांनी कधीच लग्न केले नाही.