Riteish Deshmukh Praises Kantara Chapter 1 Movie : ऋषभ शेट्टीच्या ‘कांतारा’ या सिनेमाची बरीच चर्चा झाली होती. ‘कांतारा’च्या पहिल्या भागाच्या यशानंतर अनेक चाहते दुसऱ्या भागाची आतुरतेने वाट पाहत होते आणि अखेर ‘कांतारा’चा दुसरा भाग अर्थात, ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. २ ऑक्टोबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या सिनेमानं अवघ्या काही दिवसांतच बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली आहे.

सगळीकडेच ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ या सिनेमाची चर्चा होत असून, अनेकांकडून सिनेमाचं कौतुकही होताना दिसत आहे. ‘केजीएफ’फेम अभिनेता यश, प्रभास, ज्युनियर एनटीआर, दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांसह अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे. इतकंच नव्हे, तर अनेक बॉलीवूड आणि मराठी कलाकारही ‘कांतारा चॅप्टर १’बद्दल भरभरून बोलत आहेत.

अशातच मराठी व बॉलीवूड अभिनेता रितेश देशमुखनं ‘कांतारा चॅप्टर १’चं आणि दिग्दर्शक ऋषभ शेट्टीचं कौतुक केलं आहे. अभिनेता रितेश देशमुख सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. सोशल मीडियाद्वारे तो त्याचे फोटो-व्हिडीओ पोस्ट करीत असतो. त्याचबरोबर दैनंदिन आयुष्यातील काही अपडेट्ससुद्धा शेअर करताना दिसतो. अशातच रितेशनं ‘कांतारा चॅप्टर १’ चित्रपटाचं कौतुक केलं आहे.

इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या स्टोरीमध्ये रितेश म्हणतो, ‘कांतारा : अ लिजेंड – चॅप्टर १’ पाहिल्यानंतर एक थरारक आणि भव्य भारतीय सिनेमा पाहिल्याचा अनुभव आला. ऋषभ शेट्टी, तुम्ही अभिनेता, लेखक किंवा दिग्दर्शक म्हणून ज्या पद्धतीनं काम करता, ते खरंच कौतुकास्पद आहे. तुमचं काम भविष्यातील पिढ्यांना नक्कीच प्रेरणा देईल. मी या सिनेमात जे पाहिलं, ते खरंच जादूसारखं वाटलं. उत्तम व्हीएफएक्स, जबरदस्त अ‍ॅक्शन, उत्कृष्ट छायाचित्रण, थरारक पार्श्वसंगीत व देखणं सेट डिझाईन – सगळंच सर्वोत्तम…”

पुढे रितेश कलाकारांचं कौतुक करीत म्हणतो की, रुक्मिणी वसंत तुम्ही खूपच प्रतिभावान अभिनेत्री आहात. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप शुभेच्छा! गुलशन देवैया, तुमची नकारात्मक भूमिका इतकी प्रभावी होती की, ती पाहणंही थरारक वाटलं. अशा एका दर्जेदार आणि जबरदस्त सिनेमाबद्दल चित्रपटाच्या टीमचं मनःपूर्वक अभिनंदन आणि खूप खूप शुभेच्छा!”

रितेश देशमुखने केलं ‘कांतारा: अ लिजेंड – चॅप्टर १’चं कौतुक

रितेश देशमुख इन्स्टाग्राम स्टोरी
रितेश देशमुख इन्स्टाग्राम स्टोरी

‘कांतारा : चॅप्टर १’ सिनेमानं पहिल्याच दिवशी तब्बल ६१.८५ कोटींची कमाई केली होती; तर दुसऱ्या दिवशी ४६ कोटींचा गल्ला जमवला. पहिल्या तीन दिवसांत ‘कांतारा’नं भारतात तब्बल १६२.४४ कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतातच नाही, तर जगभरात या सिनेमाचा बोलबाला पाहायला मिळत आहे.