Riteish Deshmukh Talked About Criticism and Trolling : सध्याच्या या डिजिटल युगात प्रत्येक जण सोशल मीडियावर आहे. प्रत्येक क्षेत्र हे सोशल मीडियाशी संबंधित आहे. यात मनोरंजन क्षेत्र हे तर बहुतांश सोशल मीडियावरच अवलंबून आहे. मनोरंजन क्षेत्रातले जवळपास सगळेच कलाकार सोशल मीडियावर आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांच्या, प्रेक्षकांच्या संपर्कात राहतात. आपल्या कामाची माहिती, अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियाद्वारे शेअर करत चाहत्यांना त्यांच्याविषयीची प्रत्येक अपडेट्स देत असतात.
सोशल मीडियावर या कलाकारांना एकीकडे भरभरून कौतुक मिळतं, तर दुसरीकडे मात्र ट्रोलिंग आणि टीकेचाही सामना करावा लागतो. याबद्दल काही कलाकार परखडपणे ट्रोलर्सचा समाचार घेतात. तर काही मात्र या ट्रोलिंगकडे पूर्णत: दुर्लक्ष करतात. सोशल मीडियावरील या ट्रोलिंग आणि टीका करणाऱ्यांचा सामना अभिनेता रितेश देशमुखलाही करावा लागला आहे. बॉलीवूडसह मराठी सिनेविश्वात रितेशने त्याच्या अभिनयाचं सर्वांना ‘वेड’ लावलं आहे. या शिवाय त्याने दिग्दर्शनातही त्याचं पाऊल टाकलं आहे.
‘धमाल’, ‘मस्ती’, ‘हाऊसफुल’, ‘एक व्हिलन’, ‘मुझे तेरी कसम’, ‘लय भारी’, ‘माऊली’ आणि ‘वेड’ अशा मराठी चित्रपटांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या रितेशला सुरुवातीच्या काळात ट्रोलिंग आणि टीकेचा सामना करावा लागला होता. याबद्दल त्याने बॉलीवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत भाष्य केलं. याबद्दल रितेशने असं म्हटलं की, “मला टीकेबद्दल कधीच काही समस्या नव्हती. पण मला याचा त्रास होतो की, काही टीकाकार टीका करणं सोडून वैयक्तिक टिपण्णी करतात. माझ्यावर एकदा अशी टीका करण्यात आली होती की, रितेश चित्रपटात फर्निचरच्या दुकानातील लाकडासारखा होता. तसंच एका सीनमध्ये मी डोळे सारखे मिचकावत होतो, तर एका टीकाकारने असं लिहिलं की, रितेश चित्रपटात ट्यूबलाइट वाटत होता.”
यापुढे रितेश म्हणाला की, “मला याबद्दल काही समस्या नाही. कारण या टीका मला काही तरी शिकवूनच जातात. पण वैयक्तिक टिपण्णी मला खटकते. यावर माझ्या बाबांनी मला तेव्हा खूप छान गोष्ट सांगितली होती. त्यांनी मला विचारलं होतं की, “तुझं काम काय आहे?” त्यावर मी “अभिनय करणं” असं उत्तर दिलं होतं. मग त्यांनी मला विचारलं की, “त्यांचं काय काम आहे?” मग मी म्हटलं की “आम्ही जे काम करतो त्यावर टिपण्णी करणं”. तर ते म्हणाले की, “मग त्यांना त्यांचं काम करुदे. तू तुझं तुझं काम कर आणि पुढे जा.”
यानंतर रितेशने सांगितलं की, “वडिलांनी दिलेल्या सल्ल्यापासून माझ्या हे लक्षात आलं की, मी माझ्या कामावर लक्ष देणं गरजेचं आहे. मी माझ्या कामात नावीन्य आणि विविधता कशी आणू शकेन. तसंच त्या कामातून माझ्या टीकाकारांना मी उत्तर देईन. त्यामुळे आता मला त्याचा इतका त्रास होत नाही आणि त्रास झाला तरी आपण सगळेच सोशल मीडियावर आहोत, तर कुणीही वैयक्तिक टिपण्णी केली तरी आम्ही काय करणार आहोत.” दरम्यान, रितेश सध्या त्याच्या ‘रेड २’ चित्रपटामुळे चांगलाच चर्चेत आहे. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळत आहे.