Sadhguru Gives Advice To Ranbir Kapoor For Ramayan : रणबीर कपूर प्रथमच पौराणिक भूमिकेतून प्रेक्षकांसमोर येणार आहे. येत्या काळात २०२६ मध्ये त्याची मुख्य भूमिका असलेला ‘रामायण’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. याबद्दल अनेक जण त्यांच्या विविध प्रतिक्रिया देत असतात. अशातच आता सद्गुरू यांनीदेखील याबद्दल प्रतिक्रिया दिली आहे.
सद्गुरुंनी यावेळी रणबीर कपूरचं कौतुक करत त्याला सल्लाही दिला आहे. नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’मध्ये रणबीर कपूर श्रीरामांच्या, साई पल्लवी सीतेच्या आणि दाक्षिणात्य अभिनेता यश रावणाच्या भूमिकेतून झळकणार आहेत. रणबीर श्रीरामांची भूमिका साकारणार असल्याने त्याच्याबद्दल अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जात आहेत. खासगी आयुष्यात तो मांसाहार करत असल्याने तो रामाची भूमिका कशी साकारू शकतो असंही अनेकांनी म्हटलं; तर अभिनेत्याने चित्रपटासाठी मांसाहार सोडला असल्याच्या चर्चा नंतर झाल्या.
सद्गुरुंनी रणबीर कपूरला दिला सल्ला
सद्गुरुंनी एकंदरीत रणबीर कपूर हा एक व्यक्ती असून तो श्रीरामांसारखा कसा असू शकतो आणि त्याच्याकडून अति अपेक्षा ठेवणं योग्य नाही असंही म्हटलं आहे. ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार सद्गुरू म्हणाले, “रामाची भूमिका साकारायला मिळणं ही मोठी संधी आहे, त्यामुळे तुम्ही स्वत:वर काम करायला हवं. पण, यासह तुमच्यापुढे लोकांच्या अनेक अपेक्षाही असतील.”
सद्गुरू पुढे म्हणाले, “एनटी रामा राव हे तेलुगू अभिनेते आहेत, ज्यांना लोक कृष्ण समजून त्यांची पूजा करतात, कारण त्यांनी ती भूमिका १५-१६ चित्रपटांत साकारली आहे. त्यांनी त्यांचे बासरी हातात असतानाचे मोठे पोस्टर जागोजागी लावले आणि त्याचवेळी ते इलेक्शनही जिंकले; त्यामुळे एकेकाळी अशा गोष्टी घडायच्या आणि आजही त्या आहेत.”
सद्गुरु यांनी पुढे रणबीर कपूरला काही अवाहानांना सामोरं जावं लागू शकतं आणि तो त्याचं काम छान करत आहे असंही म्हटलं आहे. ते अभिनेत्याबद्दल म्हणाले, “हे खरं तर योग्य नाहीये, कारण त्याने यापूर्वी काही चित्रपट केले आहेत आणि नंतरही करेल. पुढे कदाचित तो रावणाची भूमिकाही साकारेल, शेवटी तो कलाकार आहे. पण, त्याचवेळी तुमचे चित्रपट फक्त कलाकारांमुळे चालत नाही तर ते प्रेक्षकांमुळे चालतात त्यामुळे त्यांच्या अपेक्षा पूर्णपणे दुर्लक्षित करता येणार नाहीत. म्हणून मला असं वाटतं दिग्दर्शक व निर्मात्याने रणबीरला रामामधील काही गोष्टी आत्मसात करायला सांगितल्या पाहिजे.”
