Soha Ali Khan Reveals Terrifying Late Night Home Incident : बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर गेल्या वर्षी १६ डिसेंबर २०२४ च्या मध्यरात्री एका अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राने हल्ला केला होता. मुंबईतील राहत्या घरी अभिनेत्यावर अज्ञात व्यक्तीकडून हा प्राणघातक हल्ला झाला होता आणि त्यात त्याच्या पाठीला दुखापत झाली होती. या हल्ल्याची सर्वत्र जोरदार चर्चा झाली होती.

सैफ अली खानवरील या हल्ल्याआधी त्याची बहीण सोहा अली खानच्या घरीदेखील एका अज्ञात व्यक्तीने घरात घुसण्याचा प्रयत्न केला होता. ती व्यक्ती आणि सोहाचा बॉयफ्रेंड यांच्यामध्ये तेव्हा काहीशी झटापटही झाली होती. अज्ञात व्यक्ती घरी घुसण्याचा हा धक्कादायक अनुभव सोहाने नुकत्याच एका मुलाखतीत सांगितला आहे.

Hauterrfly ला दिलेल्या मुल्लाखतीत सोहानं याबद्दल सांगितलं की, एके दिवशी रात्री अचानक ती आणि तिचा बॉयफ्रेंड म्हणजेच आताचा तिचा नवरा कुणाल खेमू याला कसला तरी आवाज आला. तो आवाज ऐकून दोघेही उठले. तेव्हा त्यांना कळलं की, एक माणूस त्यांच्या घरात घुसला आहे आणि तो थेट त्यांच्या बेडरूमपर्यंत पोहोचला आहे. कुणालनं त्या व्यक्तीबरोबर झटापट केली आणि झटापटीत ती व्यक्ती बाल्कनीतून खाली पडला. हा अनुभव सांगताना तिनं सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली.

या घटनेबद्दल सविस्तरपणे सांगताना सोहा म्हणाली, “मुंबईत आमच्या घरात चोर शिरला होता. पहाटेचे ४ वाजले होते. आम्हाला कसला तरी आवाज आला; पण मुंबईत असे आवाज अनेकदा येत असतात. त्यामुळे आम्ही फारसं लक्ष दिलं नाही. पण कुणालला काहीतरी संशय आला म्हणून तो तपासायला गेला. त्यानं बाल्कनीचा पडदा बाजूला केला, तर समोरच चेहऱ्यावर रुमाल बांधलेला एक माणूस उभा होता.”

त्यानंतर सोहानं सांगितलं, “कुणालनं त्याला बघताच लाथ मारली आणि ते दोघं बाल्कनीत झटापट करीत गेले. मी खोलीतच होते, पोलिसांचा नंबर आठवायचा प्रयत्न करीत होते. शेवटी मी पोलिसांना फोन केला आणि त्यांनी कॉल उचलला. तेवढ्यात कुणाल आत आला आणि म्हणाला, ‘तो कदाचित मेला असेल’.”

या मुलाखतीत सोहानं मुलींबद्दलच्या गैरवर्तनाबद्दलही चिंता व्यक्त केली. त्याबद्दल ती म्हणाली, “मी जेव्हा दिल्लीमध्ये होते, तेव्हा रात्रीच्या वेळी रस्त्यावर दिवेही नसत. त्यामुळे मी नेहमी ग्रुपसह प्रवास करायचे आणि आई-वडिलांनी सांगितलेल्या वेळेपूर्वी घरी परतायचे. माझं नशीब चांगलं होतं की, मला सार्वजनिक वाहतूक वापरण्याची गरज भासली नाही; पण माझ्या अनेक मैत्रिणींना गैरवर्तनाचा सामना करावा लागला आहे. सार्वजनिक ठिकाणी महिला सुरक्षित नाहीत, हे दुर्दैव आहे.”

सोहा अली खान इन्स्टाग्राम

दरम्यान, सैफ अली खानलाही अशाच प्रसंगाला सामोरं जावं लागलं होतं. सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या वांद्र्यातील घरात एक चोर घुसला होता. चोरीच्या उद्देशानं तो घरात शिरला होता; पण सैफनं त्याला थांबवण्यासाठी प्रतिकार केला आणि त्या झटापटीत सैफ जखमी झाला; पण चोर पळून गेला. मात्र, नंतर पोलिसांनी त्याला पकडलं.