Saif Ali Khan attack:  अभिनेता सैफ अली खानवर १६ जानेवारी रोजी वांद्रे येथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी रविवारी एकाला अटक करण्यात आली. ३० वर्षीय आरोपीचे नाव मोहम्मद शरीफुल ऊर्फ विजय दास असे आहे. सैफवर हल्ला करून आल्यानंतर त्याची वागणूक सामान्य होती, असं त्याच्या मित्रांनी व त्याच्याबरोबर काम करणाऱ्यांनी सांगितलं.

“तो इतका मोठा गुन्हा करू शकतो याची कल्पनाही आम्ही केली नव्हती,” असं आरोपीचा मित्र रोहमत खान इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला. “मी सैफ अली खानवरील हल्ल्याच्या बातम्या मी वाचत होतो, एवढ्या हायप्रोफाईल व्यक्तीच्या घरात घुसून कोण हल्ला करेल, असा प्रश्न मला पडला होता… जेवढं मी त्याला ओळखतो, त्यावरून तो इतका मोठा गुन्हा करेल, असं मला कधीच वाटलं नव्हतं,” असं रोहमत खान म्हणाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शरीफुल इस्लाम सज्जाद मोहम्मद रोहिल्ला अमीन फकीर बांगलादेशातील झलोकाठी जिल्ह्यातील राजाबरिया गावचा आहे, त्याने आपली खरी ओळख लपवण्यासाठी विजय दास या नावाचा वापर केला. आरोपीचे कुटुंबीय इथे नसल्यामुळे वांद्रे पोलिसांनी त्याचा जवळचा मित्र रोहमत खानला त्याच्या अटकेची माहिती दिली.

आरोपीच्या मित्राने पोलिसांना काय सांगितलं?

“त्याला (आरोपी) एका कंत्राटदारामार्फत काम मिळालं होतं. तो हॉटेल ब्लॅबर ऑल डेच्या ठाण्यातील शाखेत हाऊसकीपिंग विभागात काम करायचा, तर मी कॅफेटेरियामध्ये काम करायचो. तो दयाळू माणूस वाटत होता. त्याने कधीही कोणाशीही वाद किंवा भांडण केलं नव्हतं, तो त्याचं काम चांगलं करायचा,” असं रोहमत म्हणाला. तो कधीही त्याच्या भूतकाळाबद्दल, कुटुंबाबद्दल किंवा त्याच्या बांगलादेश संबंधांबद्दल बोलला नव्हता. “मी डिसेंबरमध्ये हॉटेलमधील काम सोडले आणि त्याने माझ्याआधी काम सोडले होते,” असंही त्याने नमूद केलं.

इस्लाम उर्फ ​​दास सप्टेंबर ते डिसेंबर २०२४ पर्यंत ठाण्यातील हिरानंदानी येथील ब्लॅबर ऑल डेमध्ये काम करत होता. काम समाधानकारक नसल्याने रेस्टॉरंटने त्या एजन्सीबरोबरचा करार संपवला, असं या हॉटेलचे जनरल मॅनेजर नेल्सन सलधाना यांनी सांगितलं.

“तो बिजॉय दास या नावाने त्या हाऊसकीपिंग टीमचा एक भाग म्हणून आमच्याकडे कामावर आला होता. त्याला थर्ड पार्टी कंत्राटदाराने कामावर घेतलं होतं. त्याची वागणूक सभ्य होती, तो आमच्याकडे काम करत असताना आम्हाला त्याच्याबद्दल कोणतीही तक्रार नव्हती,” असं सलधाना म्हणाले. कंत्राटदाराकडे त्याला कामावर ठेवल्याची कागदपत्रे आहेत. तसेच रेस्टॉरंटकडे त्याच्या आधार आणि पॅन कार्डच्या कॉपी आहेत, त्यावर त्याचं नाव विजय दास आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गुरुवारी पहाटे आरोपी सैफच्या वांद्रे येथील घरात घुसला होता. तिथे त्याने घरातील कर्मचाऱ्यांकडून एक कोटी रुपयांची मागणी केली होती. मग सैफ अली खान तिथे आला, त्याने त्याच्यावर हल्ला केला. जवळपास ७० तास इस्लाम फरार होता. हल्ला केल्यानंतर त्याने सतत आपली ठिकाणे बदलली आणि पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी कपडे देखील बदलले होते.