Saira Banu gets nostalgic as she meets Hema Malini: बॉलीवूडमध्ये असे काही कलाकार आहेत, ज्यांना एकत्र पाहण्यासाठी चाहते उत्सुक असतात; तर काही कलाकारांच्या मैत्रीची चर्चा रंगताना दिसते.
आता दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी आणि सायरा बानू या नुकत्याच एकमेकींना भेटल्या. त्यानंतर सायरा बानू यांनी सोशल मीडियावर एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली. या फोटोमध्ये हेमामालिनी यांनी गुलाबी रंगाचा तर सायरा बानू यांनी पांढऱ्या रंगाचा ड्रेस घातल्याचे पाहायला मिळाले.
“…पण आम्ही भेटू शकलो नाही”
सायरा बानू यांनी सोशल मीडियावर लिहिले, “आम्ही आठवणीत बुडालो. काही गोष्टी अशा आहेत, ज्या खोडल्या जाऊ शकत नाहीत, त्या आठवून आम्ही खूप हसलो. खूप दिवसांपासून आम्ही भेटण्याचे ठरवत होतो, पण आम्ही भेटू शकलो नाही. तिने मला फोन केला आणि मला काही समजण्याअगोदर ती माझ्या दरवाजाबाहेर उभी होती. आम्ही काही तास एकमेकांच्या सहवासात घालवले. काही सुंदर आठवणींना उजाळा दिला. आमचे चांगले दिवस आठवले. काही आठवणी पुसता येत नाहीत.”
पुढे सायरा बानू यांनी पुढे हेमा मालिनी यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीची आठवण सांगितली. १९६७ साली प्रदर्शित झालेल्या “दिवाणा” या चित्रपटावेळी त्याची भेट झाली होती.
सायरा बानू यांनी लिहिले, “मी पहिल्यांदा तिला १९६६ साली “दिवाणा” चित्रपटाच्या सेटवर भेटले. ती तिच्या निर्मात्या अनंतस्वामीबरोबर चेंबूर येथील आरके स्टुडिओमध्ये आली होती. मला आठवते की तिच्या दिसण्याने मी प्रभावित झाले होते.”
“त्यानंतर आम्ही दक्षिणेकडील निसर्गरम्य कृष्णा राज सागर धरणावर एकाच वेळी शूटिंग करत असताना पुन्हा भेटलो. आमच्या खोल्या एकमेकांना लागून होत्या आणि संध्याकाळी माझी आई, हेमा, तिची आई आणि मी मोठ्या व्हरांड्यात एकत्र बसून स्वत:ची काळजी घ्यायची, सुंदर दिसण्याची काही रहस्ये एकमेकींना सांगायचो.”
पुढे त्यांनी हेदेखील शेअर केले की, त्यांनी व दिलीप कुमार यांनी हेमामालिनीची ओळख मद्रास प्रेसमध्ये करून दिली होती. त्या म्हणाल्या, “मद्रासमध्ये अनंतस्वामींनी आयोजित केलेल्या मी आणि दिलीप साहेबांनी बैठकीत पत्रकारांशी हेमाची ओळख करून दिली होती. दिलीप साहेब इतके दयाळू होते की त्यांनी तिची ओळख करून दिली, त्या आठवणीने हेमा भारावून गेली.”
“हेमाबरोबरच्या संभाषणादरम्यान मी तिला जन्माष्टमीची आणखी एक गोष्ट सांगितली. ती गोष्ट माझ्या हृदयाच्या खूप जवळची आहे. ‘शागीर्द’मधील ‘कान्हा’ गाण्याचे चित्रीकरण जन्माष्टमीच्या दिवशीच झाले. आम्ही नजीर हुसैन साहेब यांच्याबरोबर फिल्मिस्तान स्टुडिओमध्ये शूटिंग करत होतो. त्याचवेळी ते मद्रासमध्ये दिलीप साहेबांबरोबर ‘राम और श्याम’ या चित्रपटात काम करत होते. तारखांच्या अडचणींमुळे, नजर साहब रात्री उशिरापर्यंत माझ्याबरोबर शूटिंग करत असत आणि नंतर सकाळी लवकर विमानाने दिलीप कुमार यांच्याबरोबर काम करण्यासाठी जात असत.”
एकदा मी नजीर साहेबांना म्हणाले की, तुम्ही दिलीप साहेबांबरोबर काम करत आहात, तुम्ही खूप भाग्यवान आहात. कृपया त्यांना सांगा की सायरा त्यांच्याबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. जर त्यांनी नकार दिला तर त्यांना माझ्याशी लग्न करण्यास सांगा. माझे हे बोलणे ऐकल्यानंतर नजीर साहेब क्षणभर स्तब्ध झाले आणि नंतर ते खूप मोठमोठ्याने हसले. त्यानंतर काही दिवसांतच दिलीप कुमार माझ्या आयुष्यात आले. माझ्या आजी आणि आईकडे लग्नासाठी माझा हात मागितला. जेव्हा मी आता मागे वळून पाहते तेव्हा मला जाणवते की, जन्माष्टमी नेहमीच माझ्यासाठी मौल्यवान आशीर्वाद, मैत्री, प्रिय आठवणी आणि माझ्या आयुष्यातील प्रेम घेऊन आली आहे. हेमाला या आठवणी सांगितल्यानंतर त्या आता आणखी प्रिय झाल्या आहेत.”
सायरा आणि दिलीप कुमार यांनी ११ ऑक्टोबर १९६६ रोजी लग्न केले. ७ जुलै २०२१ रोजी ९८ व्या वर्षी दिलीप कुमार यांचे मुंबईत दीर्घ आजाराने निधन झाले.