मोहित सुरी दिग्दर्शित ‘सैयारा’ मध्ये अनित पड्डाच्या वडिलांची भूमिका अभिनेता राजेश कुमारने साकारली आहे. राजेशने एकदा शेती करण्यासाठी अभिनयाला रामराम ठोकला होता. त्याने त्याच्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपालाही विकला होता. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’ फेम राजेश कुमारला “शेती ही वाईट गोष्ट नाही किंवा लाजिरवाणी गोष्ट नाही,” नव्या पिढीला समजावून सांगायचं होतं.
गॅलाटा इंडियाला दिलेल्या मुलाखतीत राजेश म्हणाला, “शेतीत खूप नुकसान झालं होतं, पण तरीही शेतकरी असणं वाईट नाही हे मला सिद्ध करायचं होतं. मी होत असलेल्या नुकसानीकडे दुर्लक्ष करून हा विचार करत होतो की, माझं काम मुलांसाठी प्रेरणादायी ठरेल का? यातून ते काही शिकतील का? मी माझ्या मुलाच्या शाळेबाहेर भाजीपाला विकला. कोणतंही काम लहान नसतं, हे मला त्यांना समजावून सांगायचं होतं. आताच त्यांना या गोष्टी योग्य पद्धतीने शिकवल्या तर ते या सर्वांचा आदर करतील. माझ्या मुलांनी शेतकऱ्यांचा आदर करावा, असं मला वाटतं.”
मी कर्जबाजारी झालो – राजेश कुमार
राजेश कुमारला शेती करायला आवडायचं, पण ते पुरेसं नव्हतं. त्यासाठी पैशांची गरज होती. त्याच्याकडे दुसरं काम नव्हतं आणि डोक्यावर प्रचंड कर्ज झालं होतं. शेतीच्या उत्पन्नातून ते कर्ज फेडता येत नव्हतं. “मी कर्जबाजारी झालो होतो, ही बातमी खरी आहे. माझ्यावर कर्ज होतं आणि उत्पन्न नव्हतं. मी अजूनही ते कर्ज फेडतोय. आताही त्यातलं १०-१२ टक्के कर्ज फेडायचं राहिलंय,” असं राजेश कुमार म्हणाला.
शेती करणं अवघड नाही, पण…
शेती करणं अवघड नाही, असं शेती करताना आलेल्या आव्हानांबद्दल बोलताना राजेशने सांगितलं. “शेती करणं अवघड नाही. पण तुम्ही जे सेंद्रीय पद्धतीने पिकवताय ते विकत घ्यायला लोकांना तयार करणं हे सर्वात अवघड आहे. सुशिक्षित लोकांना शिकवणं हे जगातील सर्वात कठीण काम आहे. मी यातच अडकलो, मी लोकांना शिकवू लागलो. पण लोकांना हेच नको असतं,” असं राजेशने नमूद केलं.
शेतीमुळे चांगला अभिनेता व्हायला मदत झाली
शेतीतून पैसा मिळाला नाही, पण त्यामुळे चांगला अभिनेता व्हायला मदत झाली असं राजेशने म्हटलंय. “शेती केल्याने मला चांगला अभिनेता व्हायला मदत केली. आता जेव्हा भावुक भूमिका करायच्या असतात तेव्हा मी शेती करायचो ते दिवस आठवतो आणि माझ्या डोळ्यात पाणी येतं. अभिनेता म्हणून आता मला माझे आई-वडील किंवा माझ्या मित्राचं निधन झालं अशी कल्पना करावी लागत नाही,” असं राजेशने सांगितलं.
राजेश कुमार आता अभिनयात परतलाय, पण तो त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेतीविषयक माहितीचे व्हिडीओ शेअर करत असतो. तसेच तो लहान मुलांना शेती व बागकामाबद्दल माहिती देतो.