बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर रविवारी पहाटे दोन अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर पहाटे ४.५१ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. या घटनेनंतर थोड्याच वेळात वांद्रे पोलीस, गुन्हे शाखा आणि पोलिसांच्या विविध टीम घटनास्थळी दाखल झाल्या. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज सुद्धा ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असतानाच घडल्याप्रकाराबद्दल सलमानचे वडील सलीम खान यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

“आता सांगण्यासारखे काहीच नाही. कारण, असले प्रकार करून त्यांना फक्त प्रसिद्धीच्या (पब्लिसिटी) झोतात यायचं आहे. काळजी करण्याची आवश्यकता नाही.” असं सलमानचे वडील सलीम खान यांनी ‘सीएनएन न्यूज १८’शी संवाद सांगताना सांगितलं.

हेही वाचा : Video : प्रार्थना बेहेरेला पडली ‘गुलाबी साडी’ गाण्याची भुरळ! व्हिडीओवर कमेंट्सचा पाऊस

सलमान खानचा जवळचा मित्र जफर सरेशवाला याने ‘झूम’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं की, “गोळीबार झाला तेव्हा सलमान त्याच्या घरीच उपस्थित होता. घडलेल्या घटनेने त्याचे कुटुंबीय अजिबात घाबरलेले नाहीत, सलीम खान मॉर्निंग वॉकसाठी देखील बाहेर पडले होते. भाईजानच्या घरात सर्वकाही ठीक आहे.”

हेही वाचा : स्वप्नपूर्ती! रुचिरा जाधवने घेतलं नवीन घर, दारावरच्या पाटीवर लावलं आई-बाबांचं नाव, फोटो शेअर करत म्हणाली…

सलमानच्या घरी अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आल्यानंतर सध्या एक फेसबुक पोस्ट चर्चेत आली आहे. अनमोल बिश्नोई या अकाऊंटद्वारे या गोळीबाराची जबाबदारी स्वीकारण्यात आली आहे. परंतु, हे अकाऊंट फेसबुकवर सर्च केलं जाऊ शकत नाही. या अकाऊंटबाबत रिस्ट्रीक्शन्स आहेत. पोलीस सध्या या अकाऊंटची सत्यता पडताळून पाहत आहेत.

दरम्यान, दुचाकीवरून अज्ञातांनी केलेल्या गोळीबाराचं सीसीटीव्ही फुटेज आता समोर आहे. यामुळे या प्रकरणाचा पुढील तपास आता एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. याशिवाय सलमानच्या घराबाहेरील सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे.