बॉलीवूड अभिनेता सलमान खान सध्या चांगलाच चर्चेत आहे. त्याच्या वांद्रे येथील घरावर रविवारी (१४ एप्रिल) अज्ञातांनी गोळीबार केल्यावर सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींना ४८ तासांच्या आत अटक केली असून सध्या त्यांना २५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी ठोठावण्यात आली आहे.

घरावर झालेल्या हल्ल्यानंतर सलमानचा भाऊ अरबाजने यापूर्वी खान कुटुंबीयांच्या वतीने एक निवेदन जारी केलं होतं. आता या घडल्याप्रकाराबद्दल अभिनेत्याचे वडील सलीम खान यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “घाबरण्याचं काहीच कारण नाही. हे प्रकरण आता पोलिसांकडे असून ते योग्य तो तपास करत आहेत. याशिवाय सरकारने आम्हाला संपूर्ण संरक्षणाचं आश्वासन दिलं आहे. काही दिवसांत सलमान ठरलेल्या वेळापत्रकाप्रमाणे त्याची कामं पूर्ण करेल” असं सलमानच्या वडिलांनी ‘इंडिया टुडे’शी संवाद साधताना सांगितलं.

हेही वाचा : सलमान खानच्या घरावर गोळीबार झाल्यानंतर विवेक ओबेरॉयचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल, केलेलं बिश्नोई समाजाचं कौतुक

रविवारी ( १४ एप्रिल ) पहाटे पाच वाजताच्या सुमारास दुचाकीवरून येऊन विकी गुप्ता आणि सागर पाल यांनी सलमानच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर पाच वेळा गोळीबार केला. अभिनेत्याला धमकी मिळाल्यापासून त्याला आधीच Y+ सुरक्षा देण्यात आली आहे. परंतु, आता झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर सुरक्षेच्या दृष्टीने आणखी उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

हेही वाचा : “सलमानला जीवे मारण्याच्या उद्देशाने गोळीबार”, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “दोन्ही आरोपी…”

गोळीबाराच्या घटनेनंतर मंगळवारी सायंकाळी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमानची त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीदरम्यान मुख्यमंत्र्यांनी सलमानला संपूर्ण सुरक्षेचं आश्वासन दिलं. याशिवाय रविवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे, झिशान सिद्दीकी, बहीण अर्पिता शर्मा हे सुद्धा सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटवर दाखल झाले होते.