बॉलीवूडमध्ये असे अनेक कलाकार आहे, ज्यांना खूप लोकप्रियता मिळाली. पण नंतर मात्र ते इंडस्ट्रीतून गायब झाले. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीबद्दल सांगणार आहोत, जिने सलमान खानबरोबर पदार्पण केलं होतं. काही वर्षे बॉलीवूडमध्ये काम केल्यानंतर ती पुन्हा कधीही हिंदी चित्रपटांमध्ये दिसली नाही. ही अभिनेत्री म्हणजे ‘सनम बेवफा’ मधील कांचन होय.

कांचनने एका वर्तमानपत्रात जाहिरात पाहून ऑडिशन दिली होती. निर्मात्यांना कांचनची ऑडिशन फार आवडली, त्यांनी तिला सिनेमात घेतलं. कांचनला प्रचंड लोकप्रियता मिळाली. तिच्या सौंदर्याने चाहत्यांना वेड लावलं. नंतर कांचनने ‘दो हंसो का जोडा’, ‘औलाद के दुश्मन’, ‘कसम तेरी कसम’ आणि ‘पांडव’ सारखे चित्रपटही साइन केले.

कांचन एकीकडे यशाच्या शिखरावर होती, पण दुसरीकडे तिच्यासाठी इंडस्ट्रीत टिकून राहणं अवघड झालं होतं. कारण तिला सारख्याच भूमिका मिळत होत्या. तिने सलमान खान, संजय दत्त, मिथुन चक्रवर्ती आणि अक्षय कुमार यांच्याबरोबर काम केलं. त्या काळातील जवळपास सर्वच मोठ्या हिरोंबरोबर कांचनने काम केलं, पण त्याचा तिला फार फायदा झाला नाही.

कांचनने दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही केलं काम

कालांतराने इतर बोल्ड अभिनेत्रींसमोर कांचनचे सौंदर्य टिकू शकले नाही. तिला मुख्य भूमिका मिळणं बंद झालं, मग तिने छोट्या छोट्या भूमिका करायला सुरुवात केली. तिने ‘जुर्माना’ आणि ‘आर्मी’ यासह अनेक चित्रपटांमध्ये सहायक भूमिका केल्या. एक वेळ अशी आली की तिला छोट्या भूमिका मिळणंही बंद झाले. म्हणून कांचन दाक्षिणात्य इंडस्ट्रीकडे वळली. तिला दाक्षिणात्य स्टार मोहनलालबरोबर तिचा पहिला चित्रपट मिळाला. मग तिने अनेक तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले, पण हळूहळू तिला साऊथ इंडस्ट्रीत काम मिळणे कमी झाले, कारण काही तरुण बॉलीवूड अभिनेत्री दक्षिणेकडे वळू लागल्या होत्या.

kanchan
अभिनेत्री कांचन (फोटो- स्क्रीनशॉट)

एका अभिनेत्रीत जे गुण असायला हवे ते सर्व आपल्यात आहेत, असं कांचनला वाटायचं. पण तिला पहिला चित्रपट ‘सनम बेवफा’ च्या भूमिकेत टाइपकास्ट करण्यात आलं. एका विशिष्ट प्रकारच्याच भूमिका सतत केल्याने मग कलाकारांना इंडस्ट्रीत काम मिळणं बंद होतं, तेच कांचनबरोबर घडलं. काही काळाने कांचन अभिनयविश्वापासून दुरावली.

तबस्सूम टॉकिजच्या वृत्तानुसार, कांचन आता ड्रामा टीचर म्हणून एका शाळेत काम करतेय. कांचनबद्दल अधिक माहिती उपलब्ध नाही.