Salman Khan Talks about Sitaare Zameen Par : आमिर खानची मुख्य भूमिका असलेला ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट आज २० जूनपासून चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. यानिमित्ताने काल १९ जून रोजी या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी ज्येष्ठ अभिनेत्री रेखा, सलमान खान आणि इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध कलाकारांनी हजेरी लावली होती. यादरम्यान, सलमान खानने पापाराझींशी संवाद साधताना ‘सितारे जमीन पर’मध्ये आमिर खानच्या आधी तो काम करणार होता याबद्दल सांगितलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’ चित्रपटाबद्दल बोलताना सलमान म्हणाला, “आमिरने या चित्रपटासाठी मला आधी विचारलं होतं. मी भेटायला गेलोही होतो. मला चित्रपटाची कथा आवडली होती, म्हणून मी चित्रपटासाठी होकार दिला होता, पण नंतर मला फोन आला की आमिर सर स्वत: या चित्रपटात काम करणार आहेत”. आमिर खान सलमान खानचं बोलणं ऐकून हसताना दिसला आणि म्हणाला, “असं होऊ शकतं का की त्याने होकार दिल्यानतंर मी मध्ये येइन” आणि नंतर या दोघांनी एकमेकांना मिठी मारली. सलमान खानसह शाहरुख खाननेही आमिर खानला चित्रपटासाठी शुभेच्छा देण्याच्या निमित्ताने भेट दिली होती. यावेळी त्याने दिव्यांग मुलांचीही भेट घेतली होती. या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर खानची गर्लफ्रेंड गौरी स्प्रॅटनेही हजेरी लावली होती. यावेळी दोघेही पारंपरिक अंदाजात पाहायला मिळाले.
‘सितारे जमीन पर’च्या स्पेशल स्क्रिनिंगला आमिर खानसह चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत असलेली अभिनेत्री जिनिलीया देशमुखनेही तिचा रितेश देशमुखसह हजेरी लावली होती. दोघेही या स्क्रिनिंगसाठी पारंपरिक अंदाजात आले होते. जिनिलीयाने पांढऱ्या रंगाची साडी नेसली होती तर रितेशनेही पांढ्या रंगाचा ड्रेस परिधान केल्याचं दिसलं. यावेळी रितेश जिनिलीया व आमिर एकमेकांची भेट घेताना दिसले. बायकोला पाठिंबा देण्यासाठी रितेशने चित्रपटाच्या स्क्रिनिंगला हजेरी लावली होती. ‘सितारे जमीन पर’बद्दल बोलायचं झालं तर हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला असून काल या चित्रपटाच्या स्पेशल स्क्रिनिंगला अनेक प्रसिद्ध कलाकार उपस्थित होते. ‘सितारे जमीन पर’ हा चित्रपट २००७ साली आलेल्या ‘तारे जमीन पर’चा सिक्वेल आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आर. एस. प्रसन्न यांनी केलं आहे, तर निर्मिती स्वत: आमिर खानने केली आहे.
दरम्यान, आमिर खानबद्दल बोलायचं झालं तर त्याने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये तो ‘सितारे जमीन पर’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर त्याचं ड्रीम प्रोजेक्ट महाभारतवर काम करायला सुरू करणार असल्याचं म्हटलं होतं आणि या चित्रपटानंतर तो कदाचित कुठल्याही चित्रपटात काम करणार नाही असंही त्याने म्हटलं होतं.