२०१६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट आता पुनःप्रदर्शित करण्यात आला आहे. त्यावेळी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. मात्र, आता ७ फेब्रुवारीला चित्रपट पुनःप्रदर्शित केल्यानंतर बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालताना दिसत आहे. फक्त दोन दिवसांमध्ये या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली आहे. या चित्रपटामुळे अभिनेता हर्षवर्धन राणेही चांगलाच चर्चेत आला आहे.

कलाकारांचे चित्रपट गाजले की त्यांचा चाहता वर्गही वाढतो. चाहत्यांचं भरभरून प्रेम मिळावं असं प्रत्येक कालाकाराला वाटतं. मात्र, काही चाहते असं काही करतात की, कलाकारांना ही सर्वात मोठी डोकेदुखी होते किंवा चाहत्यांची भीतीही वाटते. अशात अभिनेता हर्षवर्धन राणेने नुकतीच ‘इन्स्टाबॉलीवूड’ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने त्याच्या एका चाहतीचा किस्सा सांगितला आहे.

मुलाखतीत “चाहत्यांचा एखादा मेसेज किंवा अशी एखादी कमेंट आहे का, ज्याचा तुला त्रास झाला आहे?” असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना हर्षवर्धनने किस्सा सांगितला. तो म्हणाला, “एकदा एक्स (ट्विटर) अकाउंटवर मला मेसेज आला होता की, नमस्कार सर, तुम्ही खाली या मी तुमच्या कारमध्ये बसले आहे. त्यावेळी माझी कार लॉक नव्हती. त्या मुलीचा मेसेज पाहून मी थोडा घाबरलो आणि तेव्हापासून मी कार लॉक करण्यास सुरुवात केली.”

“त्या मुलीने फक्त मेसेज केला नव्हता, तिने माझ्या कारमध्ये ती असल्याचा फोटोही पाठवला होता. तेव्हापासून मी कार लॉक करण्यास सुरुवात केली. आता यात माझीपण चूक आहे, कारण मी नेहमी माझी कार लॉक करत नव्हतो; कारण त्या कारमध्ये काहीच नसायचं, त्यात साधं म्युझिक सिस्टमही नव्हतं. तसेच ही गोष्ट मी रहात असलेल्या परिसरातील प्रत्येक व्यक्तीला माहिती होती”, असं हर्षवर्धन राणेने पुढे सांगितलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सनम तेरी कसम’ हा चित्रपट पुनःप्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करत आहे. चित्रपटातील सरू आणि इंदर या दोघांची केमेस्ट्री प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या चित्रपटात इंदर हे पात्र अभिनेता हर्षवर्धन राणेने साकारलं आहे, तर सरू ही भूमिका पाकिस्तानी अभिनेत्री मावरा हुसैनने साकारली आहे. याच महिन्यात ५ फेब्रुवारीला मावराचा निकाह झाला. सोशल मीडियावर अनेकांनी तिच्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केला. त्यानंतर लगेच दोन दिवसांनी ‘सनम तेरी कसम’ पुनःप्रदर्शित करण्यात आला.