रणबीर कपूरचा ‘अ‍ॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ८०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अ‍ॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.

फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. रणबीर, रश्मिका अन् बॉबीसह या चित्रपटातील तृप्ती डीमरीचीही चांगलीच चर्चा आहे. खासकरून बॉबीचे पात्र अब्रार हक याच्या भोवती बरीच चांगली आणि वाईट चर्चा होताना बघायला मिळत आहे.

बॉबीचं पात्र काहींना प्रचंड आवडलं आहे अन् त्यांनी हे पात्र पूढील भागातही दिसायला हवं होतं अशी इच्छा व्यक्त केली आहे. तर काही लोकांनी मात्र बॉबीचं पात्र मुस्लिम दाखवल्याबद्दल खंत व्यक्त केली आहे. बऱ्याच लोकांना ही गोष्ट खटकली आहे. नुकतंच एका मुलाखतीदरम्यान संदीप रेड्डी वांगाने या विषयावर भाष्य केलं आहे. बॉबीचं पात्र मुस्लिम दाखवण्यामागची नेमकी मानसिकता काय होती याचं उत्तर दिग्दर्शकाने दिलं आहे.

आणखी वाचा : “ही मंडळी अशिक्षित…” ‘अ‍ॅनिमल’वर टीका करणाऱ्या समीक्षकांना संदीप रेड्डी वांगाचे उत्तर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘गल्लाटा प्लस’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये संदीप म्हणतो, “आपल्या पडत्या काळात सगळेच परमेश्वराची आठवण काढतात, बरीच मंडळी चर्चमध्ये जातात, कोणत्यातरी बाबाकडे जाऊन तावीज बांधून घेतात. त्यांच्यासाठी तो एक पुनर्जन्मच असतो. आपण मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मात गेलेले बरेच लोक आपल्या आजूबाजूला पाहतो, पण आपण इतर धर्मातील कुणालाच हिंदू धर्मात येताना पाहिलेलं नाही. त्यामुळे मी ते पात्रं मुस्लिम दाखवायचा निर्णय घेतला कारण एकाहून अधिक पत्नी दाखवण्यासाठी मला ते गरजेचं होतं. पूढील भागात याच कुटुंबातील वेगवेगळ्या भावंडांचा संबंध लावता येऊ शकतो त्यामुळे माझ्या सोयीसाठी ते पात्र मी मुस्लिम ठेवले. मुसलमान लोकांना नकारात्मक पद्धतीने दाखवायचा माझा हेतू मुळीच नव्हता.”