रणबीर कपूरची प्रमुख भूमिका असलेल्या ‘अ‍ॅनिमल’ चित्रपटाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा सुरू आहे. ‘अ‍ॅनिमल’चं दिग्दर्शन ‘कबीर सिंग’ फेम संदीप रेड्डी वांगाने केलं आहे. आतापर्यंत चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्डब्रेक कामगिरी करत तब्बल ८०० कोटींहून अधिक कमाई केली आहे. चित्रपटात रणबीरच्या बरोबरीनेचे बॉबी देओल, तृप्ती डीमरी यांच्या अभिनयाचंही प्रचंड कौतुक होताना दिसत आहे. चित्रपटात रणबीर बरोबर मुख्य भूमिका साकारणाऱ्या रश्मिकाचंही काम बऱ्याच लोकांना आवडलं आहे.

ट्रेलर आला तेव्हा बऱ्याच लोकांनी रश्मिकाला तिच्या डायलॉग डिलिव्हरीवरून टोमणे मारले होते. पण ही गोष्ट तुम्हाला ठाऊक आहे की या चित्रपटासाठी सर्वप्रथम एका वेगळ्याच अभिनेत्रीला घेण्यात आलं होतं. चित्रपटातील रणबीरच्या पत्नीची म्हणजे गीतांजलीच्या भूमिकेसाठी संदीप रेड्डी वांगा यांनी सर्वप्रथम परिणीती चोप्रा हिला घेतलं होतं. परंतु नंतर काही कारणास्तव परिणीतीला चित्रपटातून संदीपने हाकलून दिल्याची बातमी समोर आली.

नुकतंच संदीप रेड्डी वांगाने या विषयावर भाष्य केलं आहे. या चित्रपटासाठी आणि खासकरून या भूमिकेसाठी परिणीती योग्य नसल्याने तिला काढण्यात आलं अन् यामुळे ती नाराजही झाली असल्याचं त्याने स्पष्ट केलं. चित्रपटासमोर सगळ्या गोष्टी दुय्यम असं संदीपचं म्हणणं असल्याने त्याने परिणीतील या चित्रपटातून काढल्याचं स्पष्ट केलं. कोमल नहाटा यांना दिलेल्या मुलाखतीमध्ये तो म्हणाला, “मी तिला सांगितलं की जमलं तर मला माफ कर, खरंतर ही माझीच चूक होती.” याआधी संदीपला ‘कबीर सिंग’मध्येही कियारा आडवाणी ऐवजी परिणीतीला घ्यायचं होतं.

आणखी वाचा : ठरलं! ‘या’ दिवशी येणार ‘शार्क टँक इंडिया’चा तिसरा सीझन; एक दोन नव्हे तर तब्बल १२ शार्क्स होणार सहभागी

चित्रीकरण सुरू होण्याआधी जवळपास दीड वर्षं आधी कोणतीही ऑडिशन न घेता संदीपने परिणीतीला या भूमिकेसाठी नक्की केलं होतं. त्याविषयी संदीप म्हणाला, “काही पात्रं ही काही कलाकारांना शोभत नाहीत. माझा ऑडिशनवर विश्वास नाही, माझं मन जे सांगेल मी त्यानुसार काम करतो. अगदी आधीपासूनच मला परिणीतीचं काम प्रचंड आवडतं, मला तिला ‘कबीर सिंग’मध्येही घ्यायचं होतं पण तेव्हादेखील ते शक्य झालं नाही. मला तिच्याबरोबर काम करायची प्रचंड इच्छा आहे आणि तिलाही ते माहीत आहे.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

परिणीतीला काढण्याबद्दल संदीप म्हणाला, “मी तिची माफी मागितली पण माझ्यासाठी चित्रपटासमोर सगळं काही क्षुल्लक आहे. मी त्यावेळी दुसऱ्या अभिनेत्रीला घेतल्याचं स्पष्ट केलं. तिला या गोष्टीचं वाईट वाटलं होतं, पण मी हे असं का करतोय हेदेखील तिला चांगलंच ठाऊक होतं.” मध्यंतरी परिणीतीनेही यावर भाष्य करताना, “या गोष्टी आयुष्यात होत असतात, आपण आपलं काम करायचं” या अर्थाचं वक्तव्य केलं होतं.