Sussanne Khan mother Zarine Khan passed away : ज्येष्ठ अभिनेते संजय खानची पत्नी आणि सुझान आणि झायेद खानची आई जरीन खान यांचे निधन झाले. जरीन खान ८१ वर्षांच्या होत्या. जरीन खान यांनी मुंबईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला. जरीन यांच्या पश्चात त्यांचे पती संजय खान आणि त्यांची चार मुलं सुझान खान, सिमोन अरोरा, फराह अली खान आणि झायेद खान आहेत.
जरीन खान यांनी १९६६ मध्ये संजय खानशी लग्न केलं. लग्न करण्यापूर्वी जरीन खान यांनी बॉलीवूडमध्ये काही काळ काम केलं होतं. ‘तेरे घर के सामने’ आणि ‘एक फूल दो माली’ सारख्या चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका केल्या होत्या. लग्नानंतर त्या संसारात रमल्या. मग त्यांनी इंटीरियर डिझायनर म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली. जरीन यांची हीच आवड त्यांची मुलगी सुझान खाननेही जोपासली आणि तीही इंटीरियर डिझायनरल झाली.
संजय खान आणि जरीन यांची प्रेमकहाणी एखाद्या चित्रपटाच्या कथेसारखी होती. हे दोघे बस स्टॉपवर पहिल्यांदा भेटले होते. पहिल्याच नजरेत दोघे प्रेमात पडले. त्यांनी १९६६ मध्ये लग्न केले. ५९ वर्षांहून अधिक काळ ते एकत्र होते. जरीन यांनी आयुष्यातील प्रत्येक चढ-उतारात तिच्या पतीला साथ दिली.
संजय खान यांच्याबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचा शेवटचा चित्रपट ‘आकर्षण’ हा १९८८ मध्ये आला होता. त्यानंतर त्यांचा एकही चित्रपट प्रदर्शित झालेला नाही. सध्या ते ८४ वर्षांचे आहेत.
सुझान खानच्या आईच्या निधनाचे वृत्त आल्यानंतर चाहते त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत. अली गोनी व जास्मिन भसीन, जया बच्चन, श्वेता बच्चनसह अनेक कलाकार त्यांच्या घरी पोहोचले आहेत. ते सुझान व तिच्या कुटुंबाचं सांत्वन करत आहेत.
