‘आदिपुरुष’ हा चित्रपट जरी बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला असला तरी सध्या आपल्याकडे ऐतिहासिक चित्रपट आणि त्यातूनही बायोपिकची चांगलीच चलती आहे. वॉर हीरोजवरील आणि ऐतिहासिक महापुरुषांवरील बायोपिक यांची सध्या चांगलीच हवा आहे. नुकताच बॉलिवूड अभिनेता विकी कौशल भारताचे पाहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशा यांच्या चरित्रपटात झळकला. चित्रपट फारसा चालत नसला तरी यातील विकी कौशलच्या अभिनयाची चांगलीच प्रशंसा होताना दिसत आहे.
हाच विकी कौशल लवकरच दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांच्या आगामी ‘छावा’ या चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बेतलेला असून गेले काही महिन्यांपासून या चित्रपटाची चांगलीच चर्चा आहे. यासाठी विकी खास तलवारबाजीचे प्रशिक्षण घेत आहे शिवाय त्याने त्याची दाढीदेखील वाढवायला सुरुवात सुरू केली आहे जेणेकरून जास्त मेक-अपची मदत न घेता विकीला त्या भूमिकेत शिरणं सोपं होईल. आता या चित्रपटाबद्दल एक नवी अपडेट समोर येत आहे.
आणखी वाचा : रणबीरचा ‘अॅनिमल’ पाहून अर्शद वारसीने मानले नीतू आणि ऋषी कपूर यांचे आभार; म्हणाला, “हा मास्टरपीस…”
लक्ष्मण उतेकर यांच्या या बहुचर्चित चित्रपटात आता एका मराठी कलाकारांची एन्ट्री झाली आहे. अभिनेता संतोष जुवेकर याने नुकतीच एक खास पोस्ट शेअर करत याबद्दल माहिती दिली आहे. या चित्रपटात संतोष एक महत्त्वाची भूमिका साकारत असल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे. ‘छावा’ चित्रपटाचा क्लॅप आपल्या चेहेऱ्यासमोर धरत संतोषने एक फोटो शेअर केला आहे, ज्यात तो लिहितो, “जय शिवराय, छत्रपती संभाजी महाराजकी जय. छावा या सिनेमात काम करण्याची संधी मिळणं हा मी राजांचा आशीर्वादच मानतो. लवकरच ही कलाकृती राजांच्या चरणी अर्पण करू, आशीर्वाद आणि शुभेच्छा असुदेत.”
अद्याप संतोषने या चित्रपटात तो नेमकी कोणती भूमिका करतोय याबद्दल खुलासा केलेला नाही. या चित्रपटाच्या निमित्ताने बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीतील दोन लोकप्रिय कलाकार प्रेक्षकांना एकत्र पडद्यावर पाहायला मिळणार आहे ही एक वेगळीच पर्वणी आहे. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर या चित्रपटावर अत्यंत मेहनत घेऊन काम करत आहेत. याआधी त्यांनी विकी कौशल व सारा अली खान यांच्या ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं, तर संतोष जुवेकरचा गेल्यावर्षी आलेला ‘३६ गुण’ हा चित्रपट चांगलाच गाजला होता.