‘केदारनाथ’ चित्रपटातून सैफ अली खानची लाडकी लेक सारा अली खानने मनोरंजनविश्वात पहिलं पाऊल ठेवलं. आजच्या घडीला तिला बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखलं जातं. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त सारा तिच्या सोशल मीडियाद्वारे सुद्धा प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते. अभिनेत्रीचा साधाभोळा अंदाज तिच्या चाहत्यांना कायम भावतो. परंतु, अनेकदा तिला ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत साराने याबाबत भाष्य केलं आहे.

सोशल मीडियावर वारंवार ट्रोलिंग व टीका होत असल्याने अनेकदा मानसिक त्रास होत असल्याचं साराने Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं. अभिनेत्री म्हणाली, “माझ्या कामाबाबत जर कोणी टिप्पणी केली, तर निश्चितच मला फरक पडतो. याउलट लोक माझ्या व्यक्तिमत्त्वाविषयी कमेंट्स करत असतील, तर मी दुर्लक्ष करते. मला फरक पडत नाही. मी खूप जास्त हसत-खेळत सर्वांचं मनोरंजन करायला जाते आणि याच गोष्टी अनेकजण नकारात्मकतेने घेतात.”

हेही वाचा : Video : “प्रेमिका…”, प्रभूदेवाच्या व्हायरल गाण्यावर माधुरी दीक्षितचा डान्स, धकधक गर्लची नेटकऱ्यांना भुरळ

सारा पुढे म्हणाली, “माझ्या स्वभावामुळे काहीजण मला मूर्ख आणि चुकीचं समजतात. त्यांना वाटतं मी आयुष्यात काहीच करू शकत नाही. पण, माझा स्वभाव असाच आहे मी कधीच खोटं वागत नाही. माझ्या जवळचे मित्र-मैत्रिणी, कुटुंबीय मला खूप चांगलं ओळखतात ते गंभीर आणि विनोदी अशा माझ्या व्यक्तिमत्त्वाच्या दोन्ही बाजू समजून घेतात. अर्थात सगळेजण असा विचार करू शकत नाही. काही लोक कधी-कधी ‘ही जोकर आहे, गंभीर कामं कशी करू शकते’ ( ये तो जोकर है) असा समज करून घेतात.”

सोशल मीडियावर होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सारा सांगते, “मी अभिनय क्षेत्रात काय काम करते, अभिनेत्री म्हणून मी कशी आहे? याशिवाय नृत्यांगना म्हणून किंवा एखाद्या पुरस्कार समारंभात मी चांगलं परफॉर्म करत नसेन, लोकांना ते आवडलं नाही तर मला जरुर वाईट वाटेल मी माझ्यात सुधारणा करेन. परंतु, माझ्या वैयक्तिक आयुष्याबाबत जर कोणी बोलत असेल तर मला खरंच फरक नाही. कारण माझं ते आयुष्य पूर्णत: वेगळं आहे. मला काय त्यांच्याशी लग्न करायचं नाहीये.”

हेही वाचा : मुग्धा वैशंपायन नवऱ्यासह पोहोचली माहेरी; अलिबागमध्ये कुटुंबीयांबरोबर केली धमाल, फोटो व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, सारा अली खानच्या कामाबद्दल सांगायचं झालं, तर तिचा ‘ए वतन मेरे वतन’ हा चित्रपट येत्या २१ मार्चला ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. स्वातंत्र्यसेनानी उषा मेहता यांच्या जीवनावर हा चित्रपट आधारित आहे. याशिवाय लवकरच ती अनुराग बसूच्या बहुप्रतीक्षित ‘मेट्रो इन दिनो’ मध्ये झळकणार आहे. यामध्ये आदित्य रॉय कपूर, पंकज त्रिपाठी, अनुपम खेर, अली फजल, फातिमा सना शेख, के के मेनन, कोंकणा सेन शर्मा आणि नीना गुप्ता यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट १३ सप्टेंबर २०२४ रोजी प्रदर्शित होणार आहे.