रणबीर कपूरचा ‘अॅनिमल’ बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटाने पाच दिवसांतच बॉक्स ऑफिसवर ४०० कोटींचा टप्पा पार केला असून प्रेक्षकांना पुन्हा चित्रपटगृहाकडे खेचून आणण्यात या चित्रपटाला यश मिळालं आहे. ‘अॅनिमल’ मध्ये प्रचंड रक्तपात, हिंसा आणि बोल्ड सीन्सदेखील आहेत ज्यामुळे त्यावर आणि त्याच्या दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगावर जोरदार टीका होतानाही दिसत आहे.
फक्त प्रेक्षकच नव्हे तर चित्रपट समीक्षक तसेच चित्रपटसृष्टीतील काही कलाकारदेखील या चित्रपटावर टीका करत आहेत. एकूणच चित्रपटातील स्त्री व्यक्तिरेखेचे चित्रण, हिंसाचार, पुरुषी वर्चस्व स्त्रियांवर लादणारी वृत्ती अशा वेगवेगळ्या मुद्द्यांमुळे या चित्रपटावर टीका होत आहे. काही सेलिब्रिटीजनी चित्रपटावर टीका केली आहे तर काही लोकांनी चित्रपटाचं आणि रणबीर कपूरचं कौतुक केलं आहे. रणबीर, बॉबी अन् रश्मिका यांच्याबरोबरच आणखी एका अभिनेत्रीचं प्रचंड कौतुक होत आहे ते म्हणजे तृप्ती डिमरीचं.
चित्रपटात अगदी छोटी पण अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारणाऱ्या तृप्तीला या चित्रपटामुळे चांगलाच फायदा झाला आहे, तिच्या चाहत्यांच्या संख्येत तर वाढ झालीच आहे पण याबरोबरच ती आता ‘नॅशनल क्रश’ म्हणूनही ओळखली जात आहे. पण तुम्हाला ठाऊक आहे की तृप्तीच्या झोया या पात्रासाठी एका वेगळ्याच बॉलिवूड अभिनेत्रीचा विचार करण्यात आला होता. ‘फिल्मफेअर’च्या रीपोर्टनुसार ‘अॅनिमल’साठी बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान हिनेदेखील ऑडिशन दिली होती.
मुख्य भूमिकेसाठी रश्मिकाची निवड झालेली होती. असं सांगितलं जातं की झोयाच्या भूमिकेसाठी सारा अली खानने ही ऑडिशन दिली होती. मीडिया रीपोर्टनुसार साराची ऑडिशन दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा यांना काही खास वाटली नाही, अशा बोल्ड भूमिकेसाठी सारा अली खान योग्य नसल्याचं संदीप यांना वाटलं. याउलट तृप्तीने दिलेली ऑडिशन पाहून टीममधील सगळेच लोक संतुष्ट आणि उत्सुक होते, त्यामुळे सारा ऐवजी ही भूमिका तृप्तीला देण्यात आली.
तृप्तीने ते पात्र उत्तमरित्या निभावलं आहे ज्यामुळे सगळीकडे तिचीच चर्चा होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. ४ दिवसांत ‘अॅनिमल’ने ४२५ कोटींची कमाई जगभरात केली आहे. चित्रपटावर टीका होत असली तरी बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाची यशस्वी घोडदौड सुरू आहे. रणबीरशिवाय या चित्रपटात रश्मिका मंदाना, अनिल कपूर, शक्ति कपूर, बॉबी देओल यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.