Bollywood Director Talk’s About Sridevi & Saroj Khan : श्रीदेवी बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री होत्या. ९० च्या काळात अनेक चित्रपटांत वैविध्यपूर्ण भूमिका साकारत त्यांनी त्यांच्या सहज सुंदर अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली. केवळ अभिनयच नव्हे तर त्यांनी त्यांच्या नृत्यानेही सर्वांची मनं जिंकली होती. परंतु, एकदा चक्क श्रीदेवी यांचं बॉलीवूडमधील लोकप्रिय नृत्यांगणा सरोज खान यांच्याशी भांडण झाल्याचं म्हटलं जातं.
सरोज खान यांनी बॉलीवूडमधील अनेक कलाकारांना नृत्य शिकवलं. त्यांनी कोरिओग्राफ केलेली गाणी खूप गाजली. सरोज खान यांनी श्रीदेवी यांच्या अनेक गाण्यांसाठी कोरिओग्राफी केली होती. सरोज यांनी श्रीदेवींच्या ‘हवा हवाई’, ‘मेरे हाथो में नौं नौं चिडिया हैं’ यांसारख्या गाण्यांची कोरिओग्राफी केली होती. परंतु, या दोघींमध्ये इतके चांगले संबंध असतानाही एक काळ असा होता, जेव्हा सरोज व श्रीदेवी यांच्यामध्ये दुरावा आला होता. याबाबत ‘चालबाज’ चित्रपटाचे दिग्दर्शक पंकज पराशर यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे.
‘इंडियन एक्स्प्रेस’च्या वृत्तानुसार पंकज यांनी श्रीदेवी व सरोज यांच्याबद्दल सांगितलं की, “सुरुवातीला त्यांना श्रीदेवी थोड्या उद्धट वाटल्या; पण चित्रपटाच्या पहिल्या एडिटनंतर गोष्टी बदलल्या. त्यांनी श्रीदेवीच्या अभिनयातील समर्पण आणि त्यांचा कलात्मक दृष्टिकोन याचे कौतुक केले, जे विशेषतः गाण्यांच्या चित्रीकरणात दिसून यायचे.”
श्रीदेवीबद्दल पुढे ते म्हणाले, “अशाच एका प्रसंगाचा उल्लेख करताना ते म्हणाले, “ती आणि सरोज खान खूप जवळच्या मैत्रिणी होत्या. आम्ही ‘भूत राजा’ हे गाणं रजनीकांतसह शूट करत होतो. त्या दोघी माझ्याशी बोलत नव्हत्या. त्यांना सवय होती की दिग्दर्शक बाजूला बसतो आणि नृत्यदिग्दर्शक व अभिनेत्री मिळून गाणं चित्रीत करतात, पण मला तसं नको होतं. मी श्रीदेवीला सांगितलं, मॅडम, मला हे माझ्या पद्धतीने शूट करायचं आहे. तेव्हा श्रीदेवी म्हणाल्या, ठीक आहे, करा.”
श्रीदेवींसाठी सरोज खान यांनी लिहिलेलं पत्र
पंकज यांनी पुढे श्रीदेवी व सरोज यांच्यातील वादाबद्दल सांगितलं. ते म्हणाले, “सरोज माझ्या घरी आल्या आणि त्यांनी मला सांगितलं की, मला तुझी मदत पाहिजे होती आणि त्यांनी मला श्रीदेवींशी संबंधित एक पत्र दिलं. त्यामध्ये लिहिलं होतं की, प्रिय श्री… आपले खूप चांगले संबंध होते, त्यामुळे भांडण मिटवून पुढे जाऊयात. मी हे पत्र श्रीदेवींसमोर त्या व्हॅनमध्ये असताना वाचलं होतं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण हे ऐकून त्यांच्या डोळ्यात अश्रू आले होते. मग मी त्यांना विचारलं की सरोजला बोलावू का, तर त्या म्हणाल्या हो, मग मी तिला बोलावलं आणि त्यांच्यामधील वाद मिटवला.”