Satish Kaushik Passed Away: चित्रपट दिग्दर्शक आणि अभिनेते सतीश कौशिक यांचं आज (९ मार्च) निधन झालं आहे. ते ६६ वर्षांचे होते. सतीश यांच्या निधनानंतर चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसह कलाकार मंडळी दुःख व्यक्त करताना दिसत आहेत. सतीश यांच्या अंतिम दर्शनाची सुरुवात झाली आहे. त्यांचं अंतिम दर्शन घेण्यासाठी कलाकार मंडळी गर्दी करत आहेत.
जावेद अख्तर, राकेश रोशन, शिल्पा शेट्टी, राखी सावंत, पंकज त्रिपाठी, सुश्मिता सेन यांसारखी बरीच मंडळी सतीश यांच्या घरी पोहोचली आहेत. दरम्यान विरल भयानीने यादरम्यानचा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे शेअर केला आहे. हा व्हिडीओ सतीश यांच्या वर्सोवा येथील घराबाहेरचा आहे.
मात्र या व्हिडीओमधील एक गोष्ट पाहून नेटकऱ्यांचा राग अनावर झाला आहे. सतीश यांच्या घराबाहेर शिवसेनेने श्रद्धांजलीचं बॅनर लावलं आहे. या बॅनरवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह काही राजकीय मंडळींचे फोटो पाहायला मिळत आहेत. यावरुनच नेटकऱ्यांचा संताप झाला आहे. त्यांनी या व्हिडीओवर विविध कमेंट केल्या आहेत.

सगळीकडेच राजकारण, एकनाथ शिंदे यांनी बॅनर लावायची संधी सोडली नाही, सगळीकडेच तुम्हाला जाहिरात करायची आहे, अशा विविध कमेंट नेटकऱ्यांनी केल्या आहेत. सतीश यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार होतील. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेकांनी गर्दी केली आहे.