Satish Shah didn’t die of Kidney Failure : ज्येष्ठ अभिनेते सतीश शाह यांचे २५ ऑक्टोबर रोजी निधन झाले. ते ७४ वर्षांचे होते. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना व कलाकारांना धक्का बसला आहे. ‘साराभाई व्हर्सेस साराभाई’मधील सहकलाकारांना तर सतीश शाह यांना शेवटचा निरोप देताना अश्रू अनावर झाले. सतीश शाह यांचे निधन किडनी फेल्युअरमुळे झाले, असं म्हटलं जात होतं. पण आता त्यांचा ऑनस्क्रीन मुलगा, अभिनेता राजेश कुमारने सतीश यांच्या निधनाचे खरे कारण सांगितले आहे.
साराभाई व्हर्सेस साराभाई या मालिकेत राजेशने सतीश शाह यांचा मुलगा रोशेश साराभाईची भूमिका केली होती. बॉलीवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत राजेशने सतीश शाहांचं निधन किडनी निकामी झाल्याने नाही झालं, असं स्पष्ट केलं आहे. “मागील २४-२५ तास किती भावनिक होते हे मी तुम्हाला सांगू शकत नाही. व्यक्त होणंही कठीण झालंय. पण सतीशजींच्या निधनाबद्दल मी काही गोष्टी स्पष्ट करू इच्छितो. हो, त्यांना किडनीचा त्रास होता, पण त्यांचं निधन हृदयविकाराच्या झटक्याने झालं,” असं राजेश कुमार म्हणाला.
सतीश शाह घरी होते – राजेश कुमार
“सतीश शाह घरी होते, जेवण करत होते, आणि मग ते… अचानक गेले. काही अहवालांमध्ये त्यांचं निधन किडनीच्या समस्येमुळे झालंय, असं म्हटलं जात आहे. पण किडनीसंदर्भातील समस्यांवर उपचार झाले होते. ते ठिक होते. दुर्दैवाने, अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली,” असं राजेश कुमारने स्पष्ट केलं.
डॉक्टरांनी सतीश शाहांना मृत घोषित केलं
सतीश शाहांचे मॅनेजर रमेश कडातला यांनीही याबद्दल सांगितंल होतं. सतीश जेवण करत असताना अचानक खाली कोसळले. रुग्णवाहिका घरी पोहोचायला अर्धा तास लागला, त्यांना रुग्णालयात नेलं तेव्हापर्यंत त्यांचं निधन झालं होतं. डॉक्टरांनी रुग्णालयात नेल्यावर त्यांना मृत घोषित केलं.
सतीश शाहांवर रविवारी, २६ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी फराह खान, जॉनी लिव्हर, सुरेश ओबेरॉय आणि इतर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी उपस्थित होते. सतीश शाहांच्या निधनानंतर साराभाई व्हर्सेस साराभाई मालिकेतील त्यांचे सहकलाकार रूपाली गांगुली, सुमीत राघवन आणि राजेश कुमार यांना अश्रू अनावर झाले होते.
सोमवारी, २७ ऑक्टोबर रोजी जुहू येथे सतीश शाहांसाठी प्रार्थनासभा आयोजित करण्यात आली होती. सोनू निगमने प्रार्थनासभेत भावुक गाणी गाऊन श्रद्धांजली वाहिली. त्याचबरोबर शबाना आझमी, रुपाली गांगुली, राजेश कुमार व इतर अनेक कलाकारांनी प्रार्थनासभेत सतीश शाहांची पत्नी मधू शाहांचे सांत्वन केले.
सतीश शाह हे यह जो है जिंदगी, हम आपके है कौन, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, जुडवा, कल हो ना हो, मैं हू ना यासारख्या बॉलीवूड चित्रपटांसाठी ओळखले जातात.
