अभिनेत्री सयानी गुप्ताने आजवर अनेक बॉलीवूड चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तसेच तिने वेब सीरिजमध्येही भूमिका केल्या आहेत. काही चित्रपटांमध्ये सयानीने बोल्ड भूमिका केल्या आहेत. इंटिमेट सीनचे शूटिंग करताना एका सहकलाकाराने मर्यादा ओलांडली होती, तो प्रसंग सयानीने एकदा मुलाखतीत सांगितला.

सेटवर इंटिमसी को-ऑर्डिनेटर्स असतात, असं सयानी म्हणाली. तसेच तिला सेटवर आलेला वाईट अनुभव तिने सांगितला. दिग्दर्शकाने शॉट कट म्हटल्यानंतरही एक अभिनेता तिला किस करत होता, असा खुलासा तिने केला. सयानीने या अभिनेत्याचे नाव सांगितलं नाही, तसेच ही घटना कोणत्या सीरिज अथवा सिनेमाच्या सेटवर घडली, त्याबद्दलही तिने उल्लेख करणं टाळलं. निर्माते असे इंटिमेट सीन अतिशय व्यावसायिक पद्धतीने शूट करतात. असे सीन करण्याआधी बरीच चर्चा होते, पण अनेकजण त्याचा फायदा उचलतात, असं मत सयानीने मांडलं.

भारतात आता इंटिमसी को-ऑर्डिनेटरची कल्पना स्वीकारली गेली आहे, याचा आनंद आहे, असं रेडिओ नशाशी बोलताना सयानी म्हणाली. सयानीने २०१३ मध्ये ‘मार्गारिटा विथ अ स्ट्रॉ’साठी पहिल्यांदा एका प्रोफेशनल इंटिमसी को-ऑर्डिनेटरबरोबर काम केलं होतं.

इंटिमेट सीन शूट करताना सहकलाकाराने ओलांडली मर्यादा

सयानीने तिच्याशी असभ्य वर्तन करणाऱ्या अभिनेत्याबरोबर काम करण्याचा अनुभव सांगितला. “बरेच लोक इंटिमेट सीनचा फायदा देखील घेतात आणि माझ्या बाबतीत असं घडलं की दिग्दर्शकाने कट म्हटल्यानंतरही तो (सहकलाकार) मला किस करत राहिला,” असं सयानी म्हणाली.

समुद्रकिनाऱ्यावर शूट करतानाचा प्रसंग

एक सीन शूट करताना खूप अस्वस्थ वाटलं होतं, असं सयानीने सांगितलं. हा इंटिमेट सीन नव्हता आणि ती गोव्यात ‘फोर मोअर शॉट्स प्लीज’च्या पहिल्या सीझनचे शूटिंग करत होती. “मला समुद्रकिनाऱ्यावरील वाळूवर तोकड्या कपड्यांमध्ये झोपायचं होतं. क्रू मेंबर्स आणि इतर ७० जण तिथे माझ्यासमोर होते. त्यावेळी मला खूप अस्वस्थ व असुरक्षित वाटलं; कारण माझ्या समोर जवळपास ७० माणसं तिथं होती,” असं सयानी म्हणाली.

सयानी म्हणाली की तिच्या शेजारी कोणीतरी शाल घेऊन उभं राहावं अशी तिची इच्छा होती पण तसं झालं नाही. गर्दीत शूट करताना असं बरेचदा होतं. तुम्हाला तुमच्या सुरक्षिततेची काळजी वाटते, पण इतरांच्या ते ध्यानीमनीही नसतं. फक्त इंटिमेट सीनच्या शूटिंगबद्दल नाही तर इतर सीन शूट करतानाही मर्यादा ओलांडल्या जातात, असं सयानी म्हणाली.

सयानी गुप्ता ‘जॉली एलएलबी २’, ‘जब हॅरी मेट सेजल’, ‘आर्टिकल १५’ आणि ‘बार बार देखो’ सारख्या अनेक चित्रपटांमधील भूमिकांसाठी ओळखली जाते. तिने आतापर्यंत अनेक गाजलेले चित्रपट व वेब सीरिजमध्ये काम केलं आहे.