अक्षय कुमारचा ‘सेल्फी’ चित्रपट या वीकेंडला प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमारने गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. अक्षयने तीन मिनिटांत सर्वाधिक सेल्फी घेण्याचा नवा विक्रम रचला आहे. अक्षयने २२ फेब्रुवारी २०२३ रोजी मुंबईत आयोजित फॅन मीट-अँड-ग्रीट इव्हेंटमध्ये हा विक्रम रचला. त्याने या इव्हेंटचे काही फोटो पोस्ट करत हा विक्रम रचल्याची माहिती दिली.

अक्षयने इन्स्टाग्रामवर फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांचे आभार मानले आहेत. “मी जे काही मिळवले आहे आणि मी आयुष्यात जिथे आहे ते माझ्या चाहत्यांच्या प्रेमामुळे आहे. माझ्या संपूर्ण करिअरमध्ये ते माझ्या पाठीशी उभे राहिले, त्याबद्दल त्यांना माझं हे ट्रिब्यूट आहे. माझ्या चाहत्यांच्या मदतीने आम्ही ३ मिनिटांत सर्वाधिक सेल्फीचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. सर्वांचे खूप खूप आभार. हे सर्व खूप खास होतं आणि माझ्या कायम लक्षात राहील,” असं अक्षयने लिहिलंय.

दरम्यान, तुम्ही विचार करत असाल की अक्षयने ३ मिनिटांत नक्की किती सेल्फी काढून हा विक्रम रचला. तर, अक्षयने १८४ सेल्फी काढल्या होत्या. त्याच्या या विक्रमानंतर चाहते त्याचं अभिनंदन करत आहेत. ‘सेल्फी’ चित्रपटाबद्दल बोलायचं झाल्यास यात अक्षय कुमार एका सुपरस्टारच्या भूमिकेत आहे आणि इमरान हाश्मी त्याच्या चाहत्याच्या भूमिकेत आहे. एका सेल्फीवरून सुरू झालेली कहाणी पुढे कशी रंजक होत जाते, हे या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.