Dharmendra’s mother was deeply offended when she heard his dialogue: १९७० आणि ८० च्या दशकात हिंदी चित्रपटसृष्टी वाईट टप्प्यातून जात होती. त्याचा परिणाम कलाकारांच्या करिअरवरदेखील होताना दिसला. दिग्गज अभिनेते धर्मेंद्र हे त्या काळातीलच अभिनेते होते.
धर्मेंद्र यांच्या कोणत्या डायलॉगमुळे त्यांची आई दुखावली गेली?
धर्मेंद्र हे सातत्याने काम करत होते. त्यांचा चित्रपट हिट होण्याची वाट बघत होते. या काळात त्यांनी अशा अनेक चित्रपटांत काम केले, जे नंतर बी ग्रेड चित्रपट म्हणून डब केले गेले. त्यांनी काही असेही चित्रपट केले, ज्याची चर्चा कुठेही झाली नाही. अशाच चित्रपटांपैकी एक ‘कयामत’ हा चित्रपट होता. १९८३ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील धर्मेंद्र यांची भूमिका पाहताना त्यांच्या आईला त्यांचा राग आला होता. चित्रपट पूर्ण होण्याआधीच त्या थिएटरबाहेर पडल्या होत्या.
राजीव विजयकर यांच्या ‘धर्मेंद्र नॉट जस्ट अ ही-मॅन’ या पुस्तकात दिग्दर्शक राज एन सिप्पी यांनी सांगितलेला एक किस्सा लिहिला आहे. राज सिप्पी म्हणालेले की चित्रपटात असा एक संवाद होता, ज्यामुळे धर्मेंद्र यांच्या आई खूप दुखावल्या. त्या सीनमध्ये धर्मेंद्र रागाने शत्रुघ्न सिन्हा यांना काहीतरी म्हणत आहेत, असे दाखवण्यात आले होते. त्या ओळी ऐकल्यानंतर धर्मेद्र यांच्या आईला फार वाईट वाटले, त्या घाबरल्या आणि चित्रपट न संपवताच त्या चित्रपटागृहाबाहेर पडल्या.
त्या ओळी अशा होत्या की, धर्मेंद्र यांचे पात्र शत्रुघ्न सिन्हा यांच्या पात्राला म्हणते की, बलात्कार काय आहे हे मी तुला शिकवेन. धर्मेंद्र यांच्या तोंडून त्यांच्या आईने तो डायलॉग ऐकला आणि त्या चित्रपटगृहाबाहेर पडल्या. धर्मेंद्र यांनी आईला समजावण्याचा प्रयत्न केला. ते त्यांना म्हणाले की तो संवाद स्क्रीप्टचा भाग आहे. चित्रपट पूर्ण पाहिल्यानंतर तू मत तयार करू शकतेस; तरीही तुझे समाधान झाले नाही, तर तू माझ्या कानाखाली मारू शकतेस.
‘कयामत’ चित्रपटात धर्मेंद्र यांच्याबरोबर बॉलीवूडचे अनेक मोठे कलाकारदेखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. शत्रुघ्न सिन्हा, स्मिता पाटील, पूनम ढिल्लन, जया प्रदा, शक्ती कपूर आणि बिंदू हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत होते.
दरम्यान, त्याच वर्षी धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओलने ‘बेताब’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटात अमृता सिंगदेखील प्रमुख भूमिकेत होती. ‘बेताब’ हा चित्रपट त्या वर्षातील गाजलेल्या चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाने सनी देओलला मोठी लोकप्रियता मिळवून दिली.