Shah Rukh Khan Cracked IIT Exam : ‘किंग खान’ म्हणून लोकप्रिय असलेला बॉलीवूड अभिनेता म्हणजे शाहरुख खान. जगभरात त्याचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. गेली दोन दशकं तो अभिनयाने प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. अभिनयात उत्तम असलेला शाहरुख शाळेत असताना एक आदर्श विद्यार्थी म्हणून ओळखला जायचा.
बऱ्याच लोकांना माहित आहे की, शाहरुखने दिल्ली युनिव्हर्सिटीतून अर्थशास्त्रचं (इकॉनॉमिक्स) शिक्षण घेतलं आणि नंतर जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातून मास कम्युनिकेशन शिकला आहे. पण फार कमी लोकांना माहित आहे की, दिल्ली युनिव्हर्सिटीत प्रवेश घेण्यापूर्वी त्याने IIT ची प्रवेश परीक्षादेखील उत्तीर्ण केली होती. हो हे खरं आहे आणि याबद्दल त्याने स्वत:च सांगितलं होतं.
२००० मध्ये बीबीसीवर करण थापर यांच्याबरोबरच्या एका मुलाखतीत शाहरुखने IIT ची प्रवेश परीक्षेबद्दल सांगितलं होतं. यावेळी तो म्हणालेला, “मी शाळेत विज्ञान (सायन्स) घेतलं होतं, पण कॉलेजमध्ये काहीतरी वेगळं शिकायचं होतं. आईलाही मी पुढे सायन्सच शिकावं असं वाटलं. त्यामुळे तिनं मला IIT ची प्रवेश परीक्षा देण्यास सांगितलं. मी ती परीक्षा दिली आणि पासही झालो. मी फक्त ही प्रवेश परीक्षा द्यावी अशी माझ्या आईची इच्छा होती’.”
या मुलाखतीत शाहरुखने आपल्या लहानपणीच्या जुन्या आठवणी सांगताना असंही नमूद केलं की, “माझ्या घरात मोकळेपणानं विचार मांडता येत होते, निर्णय घेता येत होते. माझी एक मोठी बहीण आहे. आम्हाला कधी काही हे कर, ते कर असं जबरदस्तीने सांगितलं गेलं नाही किंवा हे करू नको, ते करू नको असंही म्हटलं गेलं नाही. धर्म, शिक्षण, करिअर – या सगळ्याच बाबतीत आम्हाला आमचं म्हणणं मांडता यायचं.”
यापुढे शाहरुखने नमाजबद्दल असं म्हटलं की, “मला नमाज वाचायला जायला हवं असं सांगितलं जायचं, कारण ते चांगलं असतं आणि जेव्हा हे सांगितलं जायचं, तेव्हा माज वाचावी असं मनापासून वाटायचं. मीही माझ्या मुलांना अशाच प्रकारे वाढवावं असं माझं स्वप्न आहे. पालक जे सांगतात त्यात जबरदस्ती नसावी, भीती नसावी… पण आदर असावा.”
दरम्यान, शाहरुखच्या कामाबद्दल सांगायचं झाल्यास, त्याचे दोन वर्षांपूर्वीचे ‘पठाण’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ असे तिन्ही सिनेमे गाजले. ‘जवान’साठी तर त्याला यंदा राष्ट्रीय पुरस्कारही घोषित झाला आहे. सध्या तो आगामी ‘किंग’ सिनेमाच्या शूटमध्ये व्यग्र आहे. या सिनेमात त्याच्याबरोबर लेक सुहानादेखील असणार आहे. यानिमित्ताने ती पहिल्यांदाच शाहरुखबरोबर ऑनस्क्रीन काम करणार आहे.