This Bollywood Actor Compare’s Shah Rukh Khan With Kamal Hassan : शाहरुख खानने आजवर वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्याच्या चित्रपटांना प्रेक्षकांचा कायम भरभरून प्रतिसाद मिळतो. परंतु, अभिनेत्याचा एक असाही चित्रपट आहे ज्याला प्रेक्षकांकडून अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्यानं तो नाराज झाला होता. त्यातील त्याची भूमिकाही वेगळी होती. अशातच आता लोकप्रिय अभिनेत्यांनी या चित्रपटातील एसआरकेच्या कामावर टीका केली आहे.
शाहरुख खानने २०१८ साली ‘झिरो’ नावाचा चित्रपट केला होता. त्यामधील त्यानं साकारलेलं पात्र इतर भूमिकांपेक्षा वेगळं असल्यानं लक्ष वेधलं होतं. ‘झिरो’मध्ये शाहरुखनं बऊआ सिंग हे पात्र साकारलेलं. जे शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेलं असतं. बऊआ सिंगची उंची कमी असते. जेमतेम चार फूट अशी त्याची उंची असते. शाहरुख खानसह या चित्रपटात कतरिना कैफ, अनुष्का शर्मा अशी तगडी स्टारकास्ट असूनही प्रेक्षकांचा त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. अशातच आता अभिनेते एम. एम. फारुकी यांनी एसआरकेच्या ‘झिरो’ चित्रपटातील कामाबद्दल प्रतिक्रिया दिली आहे. फारुकी यांनी शाहरुख खानची तुलना कमल हासन यांच्याबरोबर करीत त्याच्यावर टीका केली आहे.
एम.एम फारुकी यांची प्रतिक्रिया
‘रेड एफएम’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये शाहरुख खानबद्दल अभिनेते म्हणाले, “एक व्यक्ती जी आंधळी नाहीये, ती कदाचित दृष्टी नसलेल्या व्यक्तीची भूमिका करू शकतो; पण, जी व्यक्ती बुटकी नाहीये, उंच आहे, ती एका अशा व्यक्तीची भूमिका कशी करू शकते, जी बुटकी आहे. कारण- ज्यांची जन्मत:च उंची कमी असते, त्यांचे हावभाव इतर माणसांप्रमाणेच असतात, ते आपल्यासारखाच विचार करतात; फक्त ते थोडे वेगळे दिसतात. मग तुम्ही अशी भूमिका कशी साकाराल? त्यासाठी तुम्ही तंत्रज्ञानाचा वापर करणार”.
‘झिरो’मधील शाहरुख खानच्या कामावर टीका करीत अभिनेते पुढे म्हणाले, “एसआरकेचं स्टारडम त्याला अशा भूमिका साकारण्याची परवानगी देत नाही. आम्हाला माहीत आहे की, तू छान दिसतोस वगैरे. त्यामुळे आम्ही चित्रपटात एका बुटक्या व्यक्तीकडे पाहिलंच नाही, आम्ही एका नायकालाच पाहिलं, ज्याची उंची व्हिज्युअल इफेक्ट्सचा वापर करून कमी करण्यात आलेली.”
त्यांनी शाहरुख खानच्या ‘झिरो’ची तुलना दाक्षिणात्य अभिनेते कमल हासन यांच्या अप्पूराजाशी केली. ते म्हणाले, “कमल हासन यांनी ती भूमिका बारकाईने साकारली आहे. शारीरिक व्यंग घेऊन जन्माला आलेला कमी उंचीचा माणूस त्याचे हावभाव कसे असतील, त्याचे हातवारे कसे असतील हे कमल हासन यांनी बारकाईने हेरले. बुटक्या लोकांचे हात छोटे असतात, बोटं लहान व थोडी जाड असतात, शरीर, चेहरा थोडा वेगळा असतो. त्यामुळे जर तुम्हाला वेगळेपण दाखवता येत नसेल किंवा प्रेक्षकांवर छाप पाडता येत नसेल, तर तुम्ही असे चित्रपट का बनवता?”.
एम.एम फारुकींची शाहरुख खानवर टीका
शाहरुख खान व कमल हासन यांची तुलना करीत फारुकी पुढे म्हणाले, “तू कमल हासन यांची नक्कल केली; पण त्यांच्या पायाची धूळही होऊ शकत नाही.” दरम्यान, शाहरुख खानला नुकताच ‘जवान’ चित्रपटासाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. त्याच्यासह अभिनेता विक्रांत मॅसीलाही त्याच्या ‘ट्वेल्थ फेल’ (12th Fail) चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला.