बॉलीवूडमधील नामांकित दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी दिग्दर्शन केलेला ‘स्वदेस’ हा चित्रपट हिंदीतील काही प्रसिद्ध चित्रपटांपैकी एक आहे. यामध्ये शाहरुख खान मुख्य भूमिकेत झळकला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कमाई केली होती. वस्तुथितीवर भाष्य करणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकपसंतीही मिळाली होती. पण, चित्रपट म्हटलं की त्यामागे अनेक किस्से असतात. चित्रपटाच्या सेटवर अनेक गोष्टी घडत असतात.

‘स्वदेस’ या चित्रपटाच्या सेटवरसुद्धा असाच एक प्रसंग घडला होता. चित्रपटातील कलाकार दया शंकर पांडेने नुकतच याबाबत ‘फ्रायडे टॉकीज’शी संवाद साधताना सांगितलं आहे. ‘स्वदेस’ चित्रपटाबद्दल बोलताना तो म्हणाला, “या चित्रपटात शाहरुख खानचा व माझा एक सीन आहे, जिथे मी त्याचा मित्र म्हणून त्याला गाव दाखवत असतो व तेथील गोष्टींबद्दल माहिती देत असतो. या सीनमध्ये मी बाईक चालवत असतो आणि शाहरुख खान माझ्या मागे बसलेला असतो.”

“आमच्या चित्रपटाचे दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर सेटवर खूप कडक शिस्तीने वागतात. तेव्हा त्यांना मी सांगितलं होतं की, मला बाईक चालवता येत नाही. मी कित्येक दिवस चालवलीही नाहीये, त्यामुळे आपण या सीनमध्ये शाहरुख खानला बाईक चालवायला दिली आणि मी मागे बसलो तर चालेल का असं विचारलं; यावर त्यांनी तो या गावात नवीन आहे, त्यामुळे तू त्याला तो परिसर दाखवत आहेस, म्हणून तुलाच बाईक चालवावी लागेल असं सांगितलं.”

याबद्दल बोलताना दया शंकर पांडे पुढे म्हणाले, “मग शेवटी मी त्या गावातील परिसरात सीनसाठी बाईक चालवण्याचा सराव करत होतो आणि तेव्हा शाहरुख समोर बसलेला होता. त्याने मला आवाज दिला आणि विचारलं, तुला चालवता येईल ना, मी म्हटलं हो. मग त्याने मला बाईकवरून एक राइड द्यायला सांगितली. तेव्हा, मी बाईक सुरू केली आणि माझा तोल गेला आणि आम्ही पडलो. तेव्हा शाहरुख खान आधीच पाठीच्या दुखण्याने त्रस्त होता. त्यात माझ्यामुळे तो पडला, यानंतर सेटवर सगळं वातावरण बदललं.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“माझ्यामुळे शाहरुख पडल्याने मी खूप घाबरलो होतो, त्यामुळे त्याला हात पुढे करून मदतही करू शकलो नाही. पण, नंतर तोच उठला आणि माझ्या खांद्यावर हात ठेवून कानात म्हणाला, मला माहीत होतं तुला बाईक चालवता येत नाही. त्यानंतर तो आशुतोष यांना शॉट घेऊयात असं म्हणाला, पण आशुतोष माझ्याकडे रागाने बघत होते म्हणून शाहरुख त्यांना म्हणाला, त्याच्याकडे बघू नकोस, माझी चूक होती, माझा तोल गेला.”