बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान त्याचा आगामी चित्रपट ‘पठाण’मुळे बराच चर्चेत आहे. त्याचा हा चित्रपट येत्या २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. मागच्या बऱ्याच काळापासून या चित्रपटाची जोरदार चर्चा आहे. शाहरुखचे चाहतेही या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. एवढंच नाही तर दाक्षिणात्य राज्यांतील चाहत्यांमध्येही या चित्रपटाबाबत कमालीची उत्सुकता आहे. मात्र अद्याप शाहरुखने दाक्षिणात्य राज्यात या चित्रपटाचं प्रमोशन केलेलं नाही. पण जेव्हा त्याला याबाबत विचारण्यात आलं तेव्हा मात्र त्याने मोठी अट ठेवली.

‘पठाण’च्या प्रदर्शनापूर्वी शाहरुख खान सोशल मीडियावरही त्याचं जोरदार प्रमोशन करताना दिसत आहे. नुकतंच त्याने ट्विटरवर चाहत्यांसाठी #AskSRK सेशन घेतलं होतं. या सेशनमध्ये त्याने चाहत्यांच्या मजेदार प्रश्नांची उत्तरं दिली. शाहरुखचा ‘पठाण’ चित्रपट हिंदी व्यतिरिक्त तेलुगू आणि तमिळ या भाषांमध्येही प्रदर्शित होणार आहे. याबाबत एका चाहत्याने शाहरुखला या सेशनमध्ये प्रश्न विचारला. ‘चित्रपटाच्या प्रदर्शनादिवशी तेलुगू थिएटरमध्ये येणार का?’ असा प्रश्न चाहत्याने शाहरुखला विचारला. त्यावर शाहरुखने यासाठी एक अट घातली आहे.

आणखी वाचा- ‘पठाण’च्या पहिल्या शोची तिकिटं मिळत नसल्याने चाहत्याने थेट घेतली किंग खानकडे धाव, अजब मागणी ऐकून शाहरुख म्हणाला…

चाहत्याच्या प्रश्नाचं उत्तर देताना शाहरुखने लिहिलं, “हो, जर राम चरण मला घ्यायला येणार असेल तर मी नक्की येईन.” त्यामुळे आता शाहरुखची ही इच्छा राम चरण पूर्ण करतो की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. याशिवाय जेव्हा शाहरुखला विचारण्यात आलं की, त्याचा लहान मुलगा अबरामने या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला तेव्हा त्याची प्रतिक्रिया काय होती? त्यावर शाहरुखने, “अबरामने ट्रेलर पाहिला आणि त्याला जेट पॅक सीक्वेन्स खूप आवडला. आता त्याला असंच एक जेटपॅक हवंय.” असं उत्तर दिलं.

आणखी वाचा- ‘पठाण’मध्ये शाहरुख खान दीपिकाला कीस करणार का? खुद्द किंग खाननेच दिलं उत्तर

दरम्यान ‘पठाण’ चित्रपटातून शाहरुख खान जवळपास ४ वर्षांनंतर बॉलिवूडमध्ये पुनरागमन करत आहे. तो शेवटचा २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झिरो’ चित्रपटात दिसला होता. आता ‘पठाण’मध्ये शाहरुखसह दीपिका पदुकोण, जॉन अब्राहम, आशुतोष राणा आणि डिंपल कपाडिया यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. ‘पठाण’नंतर शाहरुख खानकडे ‘जवान’ आणि ‘डंकी’ हे चित्रपट आहेत.