शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षीत ‘पठाण’ चित्रपटाच्या ट्रेलरची तारीख समोर आली आहे. चित्रपट २५ जानेवारीला प्रदर्शित होणार आहे, पण निर्मात्यांनी अद्याप ट्रेलर लाँच केला नव्हता. त्यामुळे चाहते ट्रेलरची उत्सुकतेने वाटत पाहत होते. चित्रपटाच्या प्रदर्शनाला अवघे २० दिवस बाकी आहेत, त्यामुळे ट्रेलर कधी येणार, याबदद्ल चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अशातच ट्रेलर लाँचची तारीख निर्मात्यांनी जाहीर केली आहे.
“तारीख लिहून ठेवा. ‘पठाण’चा ट्रेलर १० जानेवारी, २०२३ रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचा टीझर चर्चेत असताना ट्रेलर १० तारखेला लाँच केला जाईल. चित्रपटाचा ट्रेलर २ मिनिटे ३७ सेकंदाचा ट्रेलर असेल. तो अॅक्शन सीक्वेन्स, संगीत आणि हिरोइझमने भरलेला आहे,” अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने ‘पिंकव्हिला’ने दिली आहे. चित्रपटाचा ट्रेलर जबरदस्त असून तो प्रेक्षकांमध्ये हा अॅक्शन ड्रामा मोठ्या स्क्रीनवर पाहण्याची इच्छा निर्माण करेल, असंही म्हटलंय. चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनीही याबद्दल ट्वीट केलंय.
हेही वाचा – चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकूनसुद्धा किंग खान म्हणतो, “तुम्ही ‘पठाण’ पाहायला हवा, कारण…”
दरम्यान, चित्रपट प्रदर्शित होण्याच्या दोन आठवडे आधी ट्रेलर लाँच करण्याचा निर्णय निर्मात्यांनी खूप विचार करून घेतल्याचं म्हटलं जातंय. शाहरुखचे चाहते टीझर पाहिल्यानंतर चित्रपटाचा ट्रेलर पाहण्यासाठी उत्सुक होते. अखेर निर्मात्यांनी ट्रेलर १० जानेवारीला लाँच होणार असल्याची घोषणा केली आहे. या चित्रपटातून शाहरुख खान तब्बल चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर मुख्य भूमिकेत पुनरागमन करतोय. यापूर्वी तो रणबीर कपूरच्या ‘ब्रह्मास्त्र’मध्ये एका वैज्ञानिकाच्या भूमिकेत दिसला होता.