२०२३ मध्ये बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानने दमदार कमबॅक केला. लागोपाठ तीन ब्लॉकबस्टर चित्रपट देत शाहरुखने पुन्हा सिद्ध केलं की बॉक्स ऑफिसचा खरा बादशाह आजही तोच आहे. यापैकी शाहरुख खानच्या बहुचर्चित ‘जवान’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने नवनवीन रेकॉर्ड निर्माण केले. या चित्रपटाने पहिल्या दिवशी ७५ कोटींची कमाई केली होती. जगभरात या चित्रपटाने तब्बल १०० कोटींची कमाई केली.
‘जवान’च्या यशानंतर याचा दिग्दर्शक अॅटलीची चांगलीच चर्चा झाली. आज चित्रपटसृष्टीतील प्रत्येक स्टार अॅटलीबरोबर काम करण्यास उत्सुक आहे. अगदी सलमान खानचं नावसुद्धा सध्या अॅटलीबरोबर जोडलं जात आहे. अशातच नुकतंच अॅटलीने ‘जवान’च्या यशाबद्दल, शाहरुखबरोबर पुन्हा काम करण्याबद्दल आणि ‘जवान’च्या सीक्वलबद्दल भाष्य केलं आहे.
आणखी वाचा : काकूने घेतली पुतणी सारा अली खानची बाजू; ‘ए वतन मेरे वतन’वरुन होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल सबा पतौडी म्हणाल्या…
नुकतंच अॅटलीने ‘एबीपी’च्या एक इव्हेंटमध्ये हजेरी लावली. या कार्यक्रमादरम्यान त्याने जवानबद्दल वक्तव्य केलं. तो म्हणाला, “अद्याप याच्या सीक्वलबद्दल मी विचार केलेला नाही, पण मी नक्की यावर विचार करेन अन् काहीतरी भन्नाट प्रेक्षकांसाठी घेऊन येईन. प्रत्येक चित्रपटाचा सीक्वल बनू शकतो, पण मी माझ्या प्रेक्षकांना काहीतरी वेगळं देण्याचा प्रयत्न कायम करत असतो. ‘जवान’च्या सीक्वलबद्दल मी नक्कीच विचार करेन.”
पुढे शाहरुखबरोबर पुन्हा काम करण्याबद्दल अॅटली म्हणाला, “जेव्हा माझ्याकडे ‘जवान’पेक्षा अधिक उत्तम काही असेल तेव्हा मी नक्कीच शाहरुखला विचारेन, त्यांना कथा ऐकवेन अन् त्यांना जर ती आवडली तर आम्ही दोघे पुन्हा नक्कीच एकत्र काम करू. मला असं वाटतं की मी त्यांना जी गोष्ट ऐकवेन ती त्यांना नक्की आवडेल. शाहरुख एक वेगळंच रसायन आहे, मी आयुष्यात त्यांच्यासारखा कलाकार पाहिलेला नाही. मी त्यांचे आभार मानतो, शाहरुख सर जेव्हा माझ्याकडे ‘जवान’पेक्षा भन्नाट कथानक असेल तेव्हा मी तुमच्याकडे पुन्हा नक्की येईन.”