Shammi Kapoor and Rajesh Khanna: १९६० चे दशक हे बॉलीवूडचा सुवर्णकाळ म्हणून ओळखले जाते. या दशकात दिग्गज अभिनेते शम्मी कपूर हे सुपरस्टार म्हणून ओळखले जात होते. उत्साही, उत्तम अभिनय, स्टायलिश आणि कायम ऊर्जा असलेला अभिनेता म्हणून शम्मी कपूर लोकप्रिय झाले. त्यांचे डान्सदेखील लोकप्रिय ठरू लागले.

“जेव्हा माझे स्टारडम कमी होऊ लागले…”

‘जंगली’,’चायना टाउन’, ‘काश्मीर की कली’, ‘जानवर’ ते ‘तिसरी मंझिल’ अशा चित्रपटांतून शम्मी कपूर यांनी मोठे यश मिळवले. असाही एक काळ होता जेव्हा शम्मी कपूर हे ट्रेंडसेटर बनले होते. पण, काळ पुढे सरकला आणि त्यांची लोकप्रियता कमी होऊ लागली. त्याबद्दल चर्चाही सुरू झाल्या.

ज्येष्ठ अभिनेते आशीष विद्यार्थी यांनी सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत शम्मी कपूर यांची एक आठवण सांगितली. शम्मीजींनी मला खूप वर्षांपूर्वी एक गोष्ट सांगितली होती. मी शारजाहमध्ये ‘दास्तान’ नावाची मालिका करीत होतो आणि ते ‘चट्टान’च्या शूटिंगसाठी एका निर्मात्यासोबत तिथे आले होते.

एके दिवशी त्यांनी माझ्याशी बोलताना मला एक गोष्ट सांगितली. ते मला म्हणालेले की, एक गोष्ट लक्षात ठेव, एक काळ असा येईल की, या इंडस्ट्रीतील लोक तुला वाईट वाटेल अशा पद्धतीने बोलतील. जेव्हा माझे स्टारडम कमी होऊ लागले तेव्हा लोक माझ्याविषयी बोलू लागले. ते मला म्हणत असत की, काय झालं शम्मीजी, आजकाल लोकांची गर्दी कुठे आहे? त्यावेळी मी त्यांना म्हणायचो की, आजकाल गर्दी ‘आशीर्वाद’च्या (राजेश खन्ना यांचा बंगला) बाहेर आहे.”

आशीष विद्यार्थी पुढे असेही म्हणाले, “त्यांच्या बोलण्याचा मी विचार केला. त्यांच्या बोलण्याचा असा अर्थ होता की, आयुष्यात एक वेळ अशी येते की, लोक तुम्हाला सोडून जातात. जे लोक तुमचे कौतुक करतात, तुम्हाला डोक्यावर घेतात, तेच लोक तुम्हाला टाळतात. जेव्हा तुमचे नशीब चांगले असते, तेव्हा तुम्हाला मोठी लोकप्रियता मिळते. तुम्हाला यश मिळते; पण ती प्रसिद्धी, ते यश आयुष्यभरासाठी आहे, असे समजू नकोस.”

६० च्या दशकातील बंडखोर अभिनेते म्हणून शम्मी कपूर ओळखले जायचे. मात्र, बॉलीवूडमध्ये नवीन कलाकारांच्या येण्याने ते मुख्य प्रवाहापासून दूर गेले. ७० च्या दशकाच्या सुरुवातीला राजेश खन्ना यांनी त्यांच्या अभिनयाने मोठी लोकप्रियता मिळवली. त्यांचा मोठा चाहतावर्ग निर्माण झाला. अंदाज या चित्रपटात राजेश खन्ना व शम्मी कपूर यांनी एकत्र काम केले होते. जेव्हा अमिताभ बच्चन यांच्या अँग्री यंग मॅनच्या भूमिका लोकांना आवडू लागल्या तशी राजेश खन्ना यांच्या प्रसिद्धीला उतरती कळा लागली.