Soha Ali Khan Talks About Sharmila Tagore & Mansoor Ali Khan’s Interfaith Marriage : शर्मिला टागोर बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहेत. त्यांनी आजवर अनेक चित्रपटांत काम केलं आहे. शर्मिला कायम स्वत:च्या तत्त्वांवर आयुष्य जगत आल्या असल्याचं त्यांच्या मुलीनं म्हटलं आहे. त्यासह तिनं शर्मिला यांनी लग्नापूर्वी धर्मांतर केल्याचंही म्हटलं आहे.
लोकप्रिय अभिनेत्री सोहा अली खाननं हॉटरफ्लायला मुलाखत दिली आहे. त्यामध्ये तिनं तिच्या आई-वडिलांच्या लग्नाबद्दल सांगितलं आहे. सोहानं शर्मिला कायम त्यांना हवं तसं आयुष्यात जगत आल्या. तसेच त्यांनी अशा काळात बॉलीवूडमध्ये काम केलं जेव्हा मोठ्या घरातील लोकांचे या इंडस्ट्रीबद्दलचे विचार फार वेगळे होते. तसेच त्यांनी त्यांच्या कुटुंबानं निवडलेल्या नाही, तर स्वत: निवड केलेल्या मुलाबरोबर लग्न केल्याचं म्हटलं आहे. एवढंच काय, तर मन्सूर अली खान पतौडी यांच्याबरोबर लग्न करण्यापूर्वी त्यांनी धर्म बदलल्याचंही तिनं सांगितलं आहे.
शर्मिला टागोर यांनी लग्नापूर्वी केलेलं धर्मांतर
सोहा म्हणाली, “तिनं धर्मांतर केलं असून, तिचं नाव आयेशा असं आहे. आमच्यासाठी हे खूप गोंधळून टाकणारं असायचं. कारण कधी ती आयेशा या नावाने सही करायची, तर कधी शर्मिला. पण, व्यावसायिक जीवनात तिनं कायम शर्मिला टागोर याच नावानं काम केलं असल्यानं लोक तिला त्याच नावानं ओळखतात”. पण, तिचं नाव आयेशासुद्धा आहे.
शर्मिला टागोर यांची धर्मांतर करण्याबद्दल प्रतिक्रिया
शर्मिला टागोर आणि मन्सूर अली खान पतौडी यांनी सिमी गरेवालशी पूर्वी संवाद साधताना याबद्दल सांगितलेलं. शर्मिला म्हणालेल्या, “माझ्यासाठी हे कठीण होतं, असंही काही नाही आणि सोपं होत, असंही काही नाही. पण, त्याला सामोरं जाणं आणि समजून घेणं गरजेचं होतं. त्यापूर्वी मी खूप धार्मिक होते वगैरे असंही काही नाही. पण मला वाटतं की, आता मला हिंदुत्व आणि इस्लामबद्दल अधिक माहिती आहे.” पुढे त्यांनी सांगितलं की, मन्सूर यांनीच आयेशा हे नाव सुचवलेलं.
शर्मिला यांनी बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीतही याबद्दल सांगितलेलं. त्या म्हणालेल्या, “जेव्हा माझं लग्न होत होतं तेव्हा कोलकातामध्ये माझ्या आई-वडिलांना धमक्या दिल्या जायच्या. मन्सूरच्या कुटुंबीयांनाही धमक्या मिळत होत्या. ते यामुळे घाबरले होते; पण लग्न आणि रिसेप्शन नीट पार पडलं. असं काहीही घडलं नाही.”
शर्मिला टागोर व मन्सूर अली खान पतौडी यांचं १९६८ मध्ये लग्न झालं होतं. त्यांना सैफ अली खान, सभा व सोहा अशी तीन मुलं आहेत. २०११ साली मन्सूर अली खान पतौडी यांचं निधन झालं.