शत्रुघ्न सिन्हा हे बॉलीवूडमधील लोकप्रिय अभिनेते आहेत. ९० च्या काळात त्यांनी ‘दोस्ताना’, ‘लोहा’, ‘नसीब’, ‘काला पत्थर’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत प्रेक्षकांची मनं जिकंली. परंतु, व्यावसायिक आयुष्यामध्ये जरी त्यांना पसंती मिळत असली तरी खासगी आयुष्यामध्ये मात्र त्यांच्या सासूबाईंना ते जावई म्हणून फारसे पसंत नव्हते. त्याबाबत त्यांनी स्वत: एका मुलाखतीमध्ये त्यांची प्रेमकाहाणी सांगताना स्पष्ट केलं आहे.

शत्रुघ्न सिन्हा यांनी ‘कर्ली टेल्स’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये याबाबत सांगितलं आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांची पत्नी पूनम सिन्हा यांच्याबरोबरच्या पहिल्या भेटीबद्दल सांगितलं आहे. ते म्हणाले, “पाटण्याहून (FTII) पुण्याला जात असताना ट्रेनमध्ये एक सुंदर मुलगी दिसली. तिच्याइतकी सुंदर मुलगी मी यापूर्वी पाहिली नव्हती आणि तेव्हा (FTII)मध्ये मला सोडण्याकरता माझे काही मित्र माझ्याबरोबर आले होते. त्यांचा त्या मुलीला त्रास देण्याचा प्लॅन होता. परंतु, मी त्यांना सांगितलं की, तुम्ही तर जाल; पण मला इथे राहायचं आहे. जर तिच्या घरच्यांना वाटलं की, मी तिला त्रास दिला आहे आणि रात्री ते मला मारण्यासाठी आले, तर मी काय करू, असं म्हणून मी त्यांना तिला त्रास देण्यापासून थांबवलं”.

शत्रुघ्न सिन्हा पुढे म्हणाले, “मी तेव्हा रडत होतो. कारण- पहिल्यांदाच मी कुटुंबीयांपासून लांब हॉस्टेलमध्ये राहणार होतो. मी बिहारच्या बाहेरही कधी आलो नव्हतो. त्यामुळे मला माहीतच नव्हतं की मी हे सगळं एकट्यानं कसं करणार होतो. म्हणून मला रडायला आलेलं आणि तेव्हा पूनमसुद्धा रडत होती. कारण- तिची आई कुठल्या तरी कारणावरून तिला ओरडली होती”. अभिनेते पुढे म्हणाले की, पूनम यांच्या आईचा आधी त्यांच्या लग्नासाठी नकार होता आणि खूप वर्षांनंतर त्यांनी होकार दिला.

शत्रुघ्न सिन्हा याबाबत सांगताना “आमचं लग्न सहजासहजी झालं नाही. तिच्या कुटुंबीयांनी बऱ्याच वर्षांनंतर आमच्या लग्नासाठी होकार दिला. माझा मोठा भाऊ राम सिन्हा जो यूएसमध्ये काम करायचा, तो माझं स्थळ घेऊन पूनमच्या घरी गेला होता. परंतु, पूनमच्या आईनं स्पष्ट नकार दिला होता. त्या म्हणाल्या, तुमच्या भावाचा चेहरा पाहिला आहे का? काळा आहे तो. रस्त्यावरचा गुंड वाटतो. माझ्या मुलीकडे बघा असं वाटतं की, ती दुधामध्ये अंघोळ करते. जर तुम्ही दोघांचे कलरफुल फोटो काढले, तर तुम्हाला ते ब्लॅक अँड व्हाईटसारखे वाटतील. त्यांची जोडी चांगली दिसणार नाही. परंतु, नंतर शेवटी त्यांनी आमच्या लग्नासाठी होकार दिलाच.”

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शत्रुघ्न सिन्हा पुढे पूनम सिन्हाबद्दल म्हणाले, “आमच्या लग्नाला ४५ वर्षं झाली आहेत; पण आम्ही आजही तसेच आहोत. आम्हाला आता लव, कुश आणि सोनाक्षी अशी तीन मुलं आहेत. पण आमच्या नात्यात, आमच्या स्वभावामध्ये काहीही बदल झालेला नाही”. शत्रुघ्न सिन्हा पुढे गमतीत म्हणाले, “आजही जेव्हा ती रडते, तेव्हा मीसुद्धा रडतो”.