अभिनेत्री शीबा चड्ढा ‘बधाई दो’ आणि ‘डॉक्टर जी’ या चित्रपटांमधील तिच्या भूमिकांसाठी ओळखली जाते. शीबा चड्ढा १९९८ पासून इंडस्ट्रीत सक्रिय आहे. शाहरुख खान व मनीषा कोइराला यांचा ‘दिल से’ हा शीबाचा पहिला चित्रपट होता. नंतर तिने किंग खानबरोबर ‘फिर भी दिल है हिंदुस्तानी’, ‘रईस’ आणि झिरो’ या चित्रपटांमध्ये काम केलं.
शीबाने शाहरुखबरोबर काम केलं असलं तरी तिची त्याच्याशी जुनी ओळख आहे. शीबा व शाहरुख दोघांनीही दिल्लीतील हंस राज या एकाच कॉलेजमधून पदवीचं शिक्षण घेतलं. शाहरुख खान शीबाचा ८ वर्षे सिनियर आहे. पण रंजक गोष्ट अशी की शाहरुख मोठा असला तरी शीबाने ‘रईस’ (२०१७) आणि ‘झिरो’ (२०१८) या दोन्ही चित्रपटांमध्ये त्याच्या आईची भूमिका साकारली होती.
शीबा दिल से सिनेमाबद्दल काय म्हणाली?
सिद्धार्थ कन्ननला दिलेल्या मुलाखतीत ५२ वर्षीय शीबा म्हणाली, “दिल से मध्ये माझी भूमिका फार लहान होती. मला तर आता आठवतही नाही की माझी भूमिका नेमकी काय होती. पण मी डलहौसीमध्ये शूटिंग केलं होतं. मी शाहरुख खानला तिथे पाहिलं होतं. मी शूटिंगला गेले तेव्हा मनीषा कोइराला तिथे नव्हती. तिचं काहीतरी काम होतं आणि ती सेटवर नव्हती. त्यांना बर्फ पडताना एक खूप महत्त्वाचा शूट करायचा होता. तिथे शाहरुख व मनीषाचा एकत्र चालण्याचा एक सीन होता. मनीषा नसल्याने मणिरत्नम स्वतः माझ्याजवळ आले आणि त्यांनी मला विचारलं की मी मनीषाचा पोशाख घालून तिची बॉडी डबल म्हणून हा सीन करू शकते का?”
‘दिल से’ मधील शीबाची भूमिका खूप लहान होती. पण तिला शाहरुख खानबरोबर ‘रईस’ आणि ‘झिरो’ या चित्रपटांमध्ये स्क्रीन शेअर करण्याची संधी मिळाली. दोन्ही चित्रपटात तिने शाहरुखच्या आईच्या भूमिका केल्या.
शाहरुख खान माझा सिनियर – शीबा
“मी झिरो आणि रईसमध्ये त्याच्या आईची भूमिका केली होती. पण, तो माझा कॉलेजमधील सिनियर आहे. तो हंस राजमध्ये माझा सिनियर होता याची आठवण त्याला करून द्यायला मी विसरलेच. मी रईससाठी शूटिंग केलं तेव्हा तो दिल्लीत एका मुलाखतीसाठी गेला होता. तिथे तो म्हणाला की रईसमध्ये एक अभिनेत्री माझ्या आईची भूमिका करत आहे. तिचं काम नक्की बघा, ती उत्तम अभिनेत्री आहे. त्या सिनेमात आमचा एकत्र एकही सीन नव्हता,” असं शीबा म्हणाली.
शाहरुख खानला माझे नाव माहित होते – शीबा
शाहरुख खानच्या स्वभावाबद्दल शीबा म्हणाली, “मला आठवतंय, झिरोमध्ये आमच्यात मिठी मारण्याचा एक सीन होता. त्याला मारहाण होत होती आणि मी त्याला वाचवते असा तो सीन होता. हा सीन शूट करण्याआधी तो माझ्याजवळ आला आणि विचारलं, ‘मी तुला स्पर्श केला तर चालेल का?’ मी म्हणाले, ‘हो ठीक आहे.’ तो खूप प्रेमळ आहे. मी सेटवर येण्यापूर्वीच त्याला माझे नाव माहित होते.”
शीबाने या मुलाखतीत तिला आईच्या भूमिकांमध्ये टाइपकास्ट करण्यात आलं, याबद्दल तिचं मत व्यक्त केलं. “बहुतांश वेळा मी माझ्यापेक्षा फक्त १०-१२ वर्षांनी लहान असलेल्या मुलांच्या आईची भूमिका साकारते. टेलिव्हिजनवरही असंच होतं. तिथे तर ३० वर्षांच्या अभिनेत्री त्यांच्यापेक्षा मोठ्या कलाकारांच्या आईच्या भूमिका करतात. सुरुवातीला मला धक्का बसला होता पण मग हे काम आहे, असं मी स्वतःला समजावलं. कामाच्या बाबतीत तुम्ही बंड केल्यास तुम्हाला काम मिळणार नाही,” असं शीबाने नमूद केलं.