This Bollywood Actor Spoke About Difficult Time Of His Life : कलाकारांबद्दल तसेच इंडस्ट्रीबद्दल अनेकदा जसं दिसतं तसं नसतं असं म्हटलं जातं. पण, काहीवेळा खरोखर असं असतं; कारण पडद्यावर विविध भूमिका साकारत प्रेक्षकांना हसवणारे कलाकार खऱ्या आयुष्यात कोणत्या प्रसंगातून जात असतात हे फक्त त्यांनाच माहीत असतं. असंच काहीसं झालेलं अभिनेते शेखर सुमन यांच्याबाबतीत.

शेखर सुमन यांनी आजवर ‘अंदाज’, ‘सिंपली शेखर’, ‘लाफ इंडिया लाफ’, ‘पोल खोल’, ‘कॉमेडी सर्कस’, ‘सात फेरों की हेरा फेरी’ यांसारखे कार्यक्रम केले आहेत. आजवर त्यांनी या कार्यक्रमांतून अनेकांना पोट धरून हसवलं. असाच त्यांचा एक गाजलेला कार्यक्रम ‘देख भाई देख’दरम्यान त्यांच्या आयुष्यात मोठं वादळ आलेलं.

हा कार्यक्रमातून त्यावेळी खूप गाजलेला, पण त्यावेळी कार्यक्रम करत असताना त्यांच्या खासगी आयुष्यात आलेल्या संकटातून बाहेर यायला त्यांना खूप वेळ लागला. १९९३-१९९४ दरम्यान ते ‘देख भाई देख’ या कार्यक्रमातून पाहायला मिळत होते. त्यावेळीच त्यांच्या मुलाचं गंभीर आजारामुळे निधन झालेलं. आता त्यांनी याबद्दल इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत भावना व्यक्त केल्या आहेत.

शेअर केलेल्या पोस्टमधून ते म्हणाले, “आम्ही नुकतंच आमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखातून बाहेर पडलो, ज्यावेळी आमचा मोठा मुलगा आयुष एका दुर्मीळ हृदयाच्या आजारामुळे देवा घरी गेला. परिस्थिती खूप कठीण होती. अलका आणि मी वर्षानुवर्षे नैराश्येत होतो. अध्ययन (धाकटा मुलगा)आमचा मोठा आधार होता आणि तो अजूनही आहे. तो आमच्या जगण्याचं कारण झाला. आम्हाला त्याच्यामध्ये आयुष दिसतो. तेव्हा त्याला या दु:खाची गंभीरता समजायला तो खूप लहान होता. अलका माझ्यापेक्षा जास्त खंबीर होती. मी पूर्णपणे तुटलो होतो आणि जगायची इच्छाही नव्हती, पण अलकाने मला खूप आधार दिला आणि कुटुंबाला एकत्र बांधून ठेवलं.”

शेखर सुमन यांनी शेअर केलेल्या पोस्टखाली फराह खान, हिना खान यांसारख्या कलाकारांनी कमेंट केल्या आहेत. शेखर सुमन यांनी आजवर अनेकांना हसवलं, पण प्रेक्षकांना हसवत असताना खऱ्या आयुष्यात त्याचदरम्यान ते मात्र खूप कठीण परिस्थितीतून जात होते. परंतु, त्यांच्या धाकट्या मुलासाठी त्यांनी व त्यांच्या पत्नी अलका यांनी स्वत:ला सावरत यातून बाहेर काढलं.