Shilpa Shetty & Raj Kundra Lovestory : शिल्पा शेट्टी व तिचा नवरा राज कुंद्रा बॉलीवूडमधील लोकप्रिय सोलिब्रिटी कपलपैकी एक आहेत. दोघेही नेहमी चर्चेत असतात. हे दोघे नेहमी एकमेकांबरोबर खंबीरपणे उभे असतात. परंतु, तुम्हाला माहीत आहे का, शिल्पा शेट्टी व राज या दोघांची ओळख कशी झालेली व लग्नापूर्वी शिल्पाने अटही ठेवलेली.

राज कुंद्राने एका मुलाखतीत याबाबत सांगितलं. राज कुंद्रा हा मुळचा पंजाबचा असला तरी त्याचं संपूर्ण बालपण लंडन येथे गेलं. तो त्याच्या आई-वडिलांबरोबर बरीच वर्षे तिथे राहिला. नंतर कामानिमित्त तो दुबईतही असायचा, तिथे त्याने स्वत:चा व्यवसाय सुरू केला. दुबईमध्ये त्याची व शिल्पाची भेट झालेली. राज कुंद्राने ‘भारती टीव्ही’ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत सांगितलं.

शिल्पा शेट्टीने लग्नापूर्वी ठेवलेली ‘ही’ अट

मुलाखतीत तो म्हणाला, “मी व माझे वडील बॉलीवूड चित्रपटांचे चाहते होतो, मी शिल्पाला चित्रपटांमध्ये पाहिलेलं.” शिल्पा तेव्हा ‘बिग ब्रदर’ या कार्यक्रमामुळे दुबईत होती. ती ‘बिग ब्रदर’च्या पाचव्या सीझनची विजेती होती. तिचा मॅनेजर राज कुंद्राच्या ओळखीचा होता, त्याच्यामुळे त्यांची भेट झाली. राजने सांगितलं की, शिल्पाने लग्नानंतर ती भारत सोडून इतर कोणत्याही देशात राहणार नाही याबाबत सांगितलेलं. परंतु, बालपण आणि कुटुंब परदेशातच असल्याने राज कुंद्राची भारतात कुठलीही जमीन किंवा घर नव्हतं.

राज कुंद्राने मुंबईत घर खरेदी करण्यासाठी रिएल इस्टेट एजेंटशी संपर्क केला आणि त्याने त्याला सांगितलं की मुंबईच्या जुहूमध्ये अमिताभ बच्चन यांच्या बंगल्यासमोर सात मजली अपार्टमेंट बांधत आहेत. तेव्हा राजने त्या अपार्टमेंटमधील सातवा मजला त्यातील फ्लॅट न पाहताच खरेदी केला आणि शिल्पा शेट्टीला याबाबत सांगितलं. त्यानंतर ती त्याच्याबरोबर लग्न करायला तयार झाली. राज पुढे म्हणाला, “मला कुठे राहतो याने काही फरक पडणार नव्हता, मी कुठूनही काम करणारच होतो, पण मला ती आवडायची, त्यामुळे काही पर्याय नव्हता.”

राज कुंद्रा पुढे म्हणाला, “जेव्हा माझे सासरे सुरेंद्र शेट्टी यांचं निधन झालं तेव्हा मी माझ्या सासूबाईंना आमच्याकडे राहायला या खूप जागा आहे असं सांगितलेलं, जेणेकरून त्यांना कुठला त्रास होणार नाही; तेव्हापासून त्या आमच्याबरोबर राहत आहेत.”